नोकरीसाठी घेतलेल्या कागदपत्रांवरुन बँक खाती उघडून फसवणुक
ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना मदत करणारे अटकेत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – नोकरीसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन बोगस कंपन्यांच्या नावाने विविध बॅकेत खाती उघडून या खात्याची ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना देऊन कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील दोन आरोपींना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक पांडे आणि आकाश विश्वकर्मा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी उघडलेल्या बँक खात्यात आतापर्यंत 342 कोटी रुपये जमा झाले होते, याबाबत जीएसटीकडून नोटीस प्राप्त होताच या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 204 सिमकार्ड, विविध बँकेचे 115 पासबुक, 271 डेबीट व क्रेडिट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. प्रत्येक व्यवहारामागे या दोघांनाही पाच हजाराचे कमिशन मिळत होते.
मालाडच्या मालवणी परिसरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक करणारी एक टोळी कार्यरत होती. या टोळीने अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून त्यांचे वैयक्तिक कागदपत्रे घेतली होती. या कागदपत्रांचा गैरवापर करुन बोगस कंपन्यांच्या नावाने विविध बँकेत खाती उघडण्यात आले होते. या बँक खात्याची माहिती ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना पुरविण्यात आली होती. त्यानंतर या सायबर ठगांनी फसवणुकीसाठी याच बँक खात्याचा वापर केला होता. बँक खात्यात पैसे जमा होताच त्यांचे सहकारी ही रक्कम काढून त्यांना त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पाठवत होते. काही महिन्यांपूर्वी तक्रारदार तरुणी या आरोपींच्या संपर्कात आली होती. 20 वर्षांची ही तरुणी मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तिला नोकरीची गरज होती. त्यामुळे तिला नोकरीविषयी माहिती मिळताच तिने आरोपींकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत तिने तिचे वैयक्तिक कागदपत्रे दिली होती. तिच्या कागदपत्रावरुन आरोपींनी विविध बोगस कंपन्याच्या नावे बँकेत करंट खाते उघडले होते. तिच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. त्यामुळ तिला जीएसटीकडून एक नोटीस आली होती. हा प्रकार लक्षात येताच तिला धक्काच बसला होता.
तिच्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून त्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समजताच तिने घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत तिने नोकरीसाठी अभिषेक पांडे आणि आकाश विश्वकर्मा यांना तिचे वैयक्तिक कागदपत्रै दिल्याचे नमूद केले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोघांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या दोघांनाही वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडून नोकरीसाठी अर्ज घेतले होते.
या अर्जासोबत त्यांचे रेशनिंग कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खात्याची डिटेल्ससह इतर कागदपत्रे घेतले होते. या कागदपत्रांवरुन त्यांनी बोगस कंपन्यांच्या नावाने बॅक खाती उघडले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना पुरविली होती. गेल्या चार महिन्यांत या बँक खात्यात 342 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. जीएसटी नोटीस प्राप्त होताच हा प्रकार उघडकीस आला होता. तपासात ही माहिती उघड होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही आरोपींच्या राहत्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणाात बेरोजगार तरुण-तरुणींचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रत, 204 सिमकार्ड, विविध बँकेचे 115 पासबुक, 271 डेबीट आणि क्रेडिट कार्ड, प्रिंटर, मोबाईल फोन, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात ते दोघेही ऑनलाईन फसवणुक करणार्या एका मोठ्या सायबर टोळीच्या संपर्कात होते. त्यांनाच त्यांनी बँक खात्याची डिटेल्स दिली होती. प्रत्येक व्यवहारामागे त्यांना पाच हजाराचे कमिशन मिळत होते. यातील अभिषेक बोरिवली तर आकश कांदिवलीचा रहिवाशी आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.