हत्येसह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
अटकेच्या भीतीने 21 वर्षांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
विरार, – हत्येसह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या साजिद ऊर्फ परवेज आशिअली या 55 वर्षीय आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच साजिद हा अटकेच्या भीतीने पळून गेला होता, अखेर 21 वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी विरार पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत.
20 मे 2004 रोजी साजिदविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात हत्येसह लैगिंक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्याने तक्रारदार तरुणीवर तिच्या मनाविरुद्ध लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. ही माहिती तिच्या आईला समजताच तिने साजिदला जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या घटनेनंतर पिडीत मुलीला तिच्या आईने त्याला भेटण्यास मनाई केली होती. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने तिला भेटायला बोलावून तिला लाथ्याबुक्यांनी बेदम ारहण केली होती. जमिनीवर आपटून तिची हत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्याविरुद्घ गुन्हा नोंदवून त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
मात्र अटकेच्या भीतीने तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो स्वतचे अस्तित्व लपवून राहत होता. तरीही त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. साजिद हा धारावी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने धारावीतील मेन रोड, जामा मशिदजवळील चमडा बाजार परिसरातून साजिदला ताब्यात घेतले. चौकशीत हत्या आणि लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील तो वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी विरार पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.