चीनमधून प्रत्यार्पण झालेला पहिला गॅगस्टर गजाआड
मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर प्रसाद पुजारी गुन्हे शाखेच्या ताब्यात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – चीनमधून प्रत्यार्पण झालेल्या पहिल्या गॅगस्टरला गजाआड करण्यात भारतीय तपास यंत्रणेला इंटरपोलच्या मदतीने यश आले आहे. प्रसाद विठ्ठल पुजारी असे या गॅगस्टचे नाव असून तो भारतातून पळून गेल्यानंतर काही वर्षांपासून चीनमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रात्री उशिरा त्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाईल आणि नंतर त्याचा ताबा गुन्हे शाखेकडे सोपविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रसादविरुद्ध हत्येसह अपहरण, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो छोटा राजन आणि कुमार पिल्ले टोळीशी संबंधित आहे. त्यांच्या आदेशावरुन तो विदेशातून गुन्हेगारी कारवाया करत होता.
प्रसाद पुजारी हा भारतातील मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार समजला जातो. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे अशा दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ साली त्याच्याविरुद्ध शेवटच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. विक्रोळीतील शिवसेनेच्या एका पदाधिकार्यावर त्याच्या आदेशावरुन त्याच्या सहकार्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात हा पदाधिकारी थोडक्यात बचावला होता. या गोळीबारामागे नंतर प्रसाद पुजारीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. त्याने स्वतच्या नावाची दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व उपनगरातील अनेक बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली होती. खंडणी दिली नाहीतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या धमकीनंतर त्याला काही व्यावसायिकांनी खंडणीची रक्कम दिली होती. प्रसाद हा पूर्वी छोटा राजनसाठी काम करत होता. नंतर तो कुमार पिल्ले टोळीत सामिल झाला होता. या दोघांशी त्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्याच्या इशार्यावरुन तो विदेशात राहून गुन्हेगारी कारवाया करत होता.
मार्च २००८ रोजी तो चीनला पळून गेला होता. तात्पुरत्या व्हिसावर चीनमध्ये प्रवेश केल्यानंतर तो एका चीनी महिलेच्या संपर्कात आला होता. तिच्याशी मैत्री केल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर या दोघांनी विवाह केला होता. या दोघांना एक चार वर्षांचा मुलगा असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून त्याचे त्याच्या पत्नीशी बिनसले होते. त्यांच्यात सतत खटके उडत होते. पत्नीशी होणार्या भांडणानंतर तो इंटरपोलच्या नजरेत आला होता. फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला हॉगकॉंग येथून चीनी अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या अटकेची माहिती इंटरपोलला देण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध बोगस पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. चौकशीत त्याने भारताचा मोस्ट वॉण्टेड गॅगस्ट प्रसाद पुजारी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर इंटरपोलने भारतीय तपास यंत्रणेशी संपर्क साधून त्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला चीनमधून भारतात पाठविण्यात आले.
रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा ताबा गुन्हे शाखेकडे सोपविला जाणार आहे. दुसरीकडे त्याच्या कारवायाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. अटकेच्या भीतीने तो मुंबईतून पळून गेला होता. २००८ साली त्याला चीनचा तात्पुरता व्हिसा मिळाला होता. त्याची मुदत मार्च २०१२ रोजी संपली होती. तेव्हापासून तो त्याच्या पत्नीसोबत लुओहू येथे राहत असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघडकीस आले आहे. गेल्या सोळा वर्षांपासून तो फरार होता, अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. चीनमधून एखाद्या गॅगस्टरचे प्रत्यार्पण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.