खंडणीसह हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस युपीतून अटक
गुन्हा दाखल होताच गेल्या 26 वर्षांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 एपिल 2025
भिवंडी, – भिवंडीतील एका व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण व लुटमार करुन हत्या करणार्या वॉण्टेड आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. विनोदकुमार श्यामलाल गुप्ता असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी भिवंडी शहर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच विनोदकुमार हा गेल्या 26 वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी तपास थांबविल्याची खात्री होताच तो पुन्हा उत्तरप्रदेशला आला आणि त्याने स्वतचे मेडीकल स्टोर सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जिगर महेंद्र मेहता हे व्यावसायिक असून त्यांचा पॉवर लुम कारखाना होता. त्यांच्या कारखान्यात वॉण्टेड आरोपी राजू मेहता ऊर्फ बिशनसिंग लक्ष्मणसिंग सावंत हा कामाला होता. राजूने विनोदकुमार व कमलेश रामलखन उपाध्याय यांच्या मदतीने जिगर मेहता यांचे खंडणीसाठी अपहरण करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे 28 मे 1999 साली त्यांनी कारखान्यातील विजेची वायर तोडून वीज पुरवठा खंडीत केला. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी त्यांनी जिगर मेहता यांना बोलावून तंचे अपहरण केले होते. त्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याची चैन, अंगठी, पैसे चोरी केले होते. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून या तिघांनी त्यांची तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन हत्या केली होती. त्यांचा मृतदेह ठाकूरपाडा-सरवली शिवारातील अनंता शंकर ठाकरे यांच्या पडिक शेतात टाकून ते तिघेही पळून गेले होते. हत्येनंतर या तिघांनी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या सुटकेसाठी दहा लाखांची खंडणीची मागणी केली होतीे. पैसे दिले नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
हा प्रकार उघडकीस येताच भिवंडी पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्याविरुद्ध अपहरणासह खंडणी, लुटमार करणे आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्हयांत कमलेश उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून राजू मेहता आणि विनोदकुमार गुप्ता यांचा सहभाग उघडकीस आला होता. गुन्हा घडल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या दोघांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु केला होता. पोलीस हवालदार दादासाहेब पाटील हे गेल्या एक वर्षांपासून विनोदकुमारची माहिती काढून त्याचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना विनोदकुमार हा उत्तरप्रदेशात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरक्षक संजय शिंदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, पोलीस हवालदार दादासाहेब पाटील, पोलीस नाईक दिनकर सावंत, पोलीस शिपाई मयुर शिरसाट आदीचे एक विशेष पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी 22 एप्रिलला सिद्धार्थनगर, भवानीगंज रेल्वे स्थानक परिसरातून साध्या वेशात पाळत ठेवून विनोदकुमारला ताब्यात घेतले होते. चौकशीत गेल्या 26 वर्षांपासून वॉण्टेड असलेला विनोदकुमार हा तोच आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करुन तीन दिवसांच्या ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी ठाण्यात आणण्यात आल होते.
चौकशीत विनोदकुमार मेडीकल स्टोर चालक असून मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, परसाहेतिम, राणी भानपूरचा रहिवाशी आहे. त्याचे बॅचलर ऑफ ईलेक्ट्रो-होमिओपॅथी मेडीसीन अॅण्ड सर्जरीचे शिक्षण वांद्रे येथील जिजामाता कॉलेजमध्ये झाले आहे. हत्येनंतर तो मुंबईत आला आणि नंतर त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. त्यानंतर काही वर्ष तो दिल्लीत वास्तव्यास होता. अटकेच्या भीतीने तो स्वतजवळ मोबाईल ठेवत नव्हता. गेल्या 26 वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. जानेवारी 2025 रोजी त्याला पोलीस आपला शोध नसल्याची खात्री झाली होती. त्यामुळे तो पुन्हा त्याच्या गावी आला आणि त्याने त्याचे मेडीकल स्टोर सुरु केले होते. मात्र पोलीस खबर्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अखेर त्याला 26 वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.