फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दिल्लीतून अटक
कर्जाच्या आमिषाने घाटकोपरच्या व्यावसायिकाला गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मोहम्मद सय्यद मजहर या आरोपी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दिल्लीतून अटक केली. या गुन्ह्यांत अटक झालेला सय्यद मजहर हा चौथा असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने वीस कोटीचे कर्ज देण्याची बतावणी करुन घाटकोपर परिसरातील एका व्यावसायिकाची सुमारे 96 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत मोहम्मद इरफान जाफर नावाचा एक आरोपी अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींविरुद्ध विविध राज्यात अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
48 वर्षांच्या तक्रारदारांचा सॉफ्टवेअरचा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीचे घाटकोपर परिसरात एक कार्यालय आहे. त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी कर्जाची आवश्यकता होती. याच दरम्यान आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला त्यांना 50 कोटीचे कर्ज देतो असे सांगण्यात आले होते, मात्र नंतर त्यांना वीस कोटीचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले होते. या आरोपींनी त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी, कमिशनसह इतर कामासाठी 96 लाख रुपये घेतले होते, याकामी त्यांना चेन्नई येथे बोलाविण्यात आले होते. तिथे त्यांच्याकडून कर्जाचे अर्ज भरुन घेण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कर्ज मिळवून दिले नाही. ही आर्थिक फसवणुक 11 ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत झाली होती. विचारणा केल्यानंतर संबंधित आरोपी विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल बंद करुन पलायन केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच डिसेंबर 2023 रोजी व्ही. एम. मोहम्मद दाऊद ऊर्फ सतीश श्रीराम ऊर्फ सात्विक चंद्रशेखर, थिरु विजयकुमार ऊर्फ विजी ऊर्फ कुमार ऊर्फ गणपती विजयकुमार, फेब्रुवारी 2024 रोजी श्रीराम ऊर्फ नरसिंहन रामदास या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सय्यद मजहर आणि मोहम्मद इरफान यांचे नाव समोर आले होते, मात्र त्यांच्या अटकेनंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना दोन दिवसांपूर्वी सय्यद मजहर याला दिल्लीतून खंडणीविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.
या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला गुरुवारी सायंकाळी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवार 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्जाच्या आमिषाने फसवणुक करणारी ही सराईत आंतरराज्य टोळी असून या टोळीविरुद्ध मुंबईसह दिल्ली, चेन्नई, झारखंड येथील विविध पोलीस ठाण्यात पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतील बहुतांश तक्रारदार नामांकित व्यावसायिक असून त्यांच्याकडून कर्जासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले होते. मात्र कोणालाही कर्ज न देता त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील दाऊद हा मुख्य आरोपी असून त्यानेच इतर सहकार्यांच्या मदतीने फसवणुकीचा धंदा सुरु केला होता.