शिवडीतील श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरात चोरट्याची हातसफाई

मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करुन सात लाखांचा मुद्देमाल पळविला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – शिवडीतील श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने हातसफाई केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करुन या चोरट्याने मंदिरातील विविध दागिने, चांदीचे मुकूंट आणि कॅश असा सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता ते बुधवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान शिवडीतील ए. डी मार्ग, मूळराज भवन इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरात घडली. 57 वर्षांचे बिपीन छगनलाल लालन हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवडी परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा ऑईल पेंटचे रिटल शॉप आहे. शिवडी येथे श्री शिवरी जैन संघ नावाची एक ट्रस्ट असून या ट्रस्टच्या मालकीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या ट्रस्टमध्ये ते सभासद असल्याने मंदिरातील सर्व व्यवहार त्यांच्याकडे होता. या मंदिरात हितेंद्रसिंह देवेंद्रसिंह परमार हे पुजारी म्हणून काम करतात.

सकाळी साडेपाच वाजता मंदिर उघडल्यानंतर हितेंद्रसिंह हे साफसफाई करुन तिथे पूजा करतात. दिवसभर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी असून रात्री आठ वाजता मंदिर बंद केले जाते. बुधवारी सकाळी हितेंद्रसिंह हे नेहमीप्रमाणे मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार ट्रस्टचे सभासद जितेंद्र छेडा यांना सांगितला. या दोघांनी मंदिराची पाहणी करुन सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी त्यांना सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआर मेन वायर कट झालेली दिसली. मंदिरातील दानपेटी उघडी दिसली. अज्ञात व्यक्तीने रात्री उशिरा मंदिराच्या खिडकीतून आत प्रवेश केला होता. त्यानंतर मंदिरातील सात लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यात विविध सोन्याचे दागिने, चांदीचा मुकूंट आणि पाच हजाराची कॅशचा समावेश आहे.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बिपीन लालन यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page