कर्जाच्या आमिषाने वयोवृद्धाची 1 कोटी 14 लाखांची फसवणुक
कॉल सेंटरमध्ये मुंबई-दिल्ली पोलिसांची संयुक्तपणे कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने मुंबईसह दिल्ली व इतर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील एका कॉल सेंटरमधून अनेकांना कॉल करुन ही फसवणुक केली जात होती. दिल्लीतील या कॉल सेंटरमध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर सेलसह दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करुन तीन आरोपींना अटक केली आहे. शेहजाद लालमोहम्मद खान ऊर्फ रेहमान, अनुज उत्तमसिंग रावत ऊर्फ अनिलकुमार यादव आणि मोहम्मद आमीर हुसैन अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे दिल्लीचे रहिवाशी आहे. या टोळीने एका वयोवृद्धाला शून्य टक्के व्याजदाराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांची 1 कोटी 14 लाखांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी 105 मोबाईलसह एक लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून या मोबाईल क्रमांकाचा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर 132 हून अधिक सायबर गुन्ह्यांत वापर झाला असून त्यात कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाली आहे.
यातील वयोवृद्ध तक्रारदार पश्चिम उपनगरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो बजाज फायनान्स कंपनीच्या दिल्ली कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून बजाज फायनान्सकडून वयोवृद्ध नागरिकांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येत आहे. त्यांना कर्जाची आवश्यकता आहे का अशी विचारणा करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बजाज फायनान्ससह एका नामांकित बँकेचे लोगो आणि स्टॅम्प असलेले कागदपत्रे पाठविले होते. त्यांच्याकडून कर्जासाठी होकार मिळताचतंनी विविध कारण सांगून त्यांना काही बँक खात्यात एक कोटी चौदा लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. मात्र कुठलेही कर्ज न देता त्यांनी कर्जाच्या प्रोसेसिंग फीसह इतर कारणासाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदार तक्रारदारांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, संदीप पाचंगणे, पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, पोलीस हवालदार सचिन सावंत, पोलीस शिपाई केशव तकीक, अमोल फाफळे, दिपक पडळकर, राहुल भडांगे, प्रितम व्यवहारे यांनी तपास सुरु केला होता.
तपासात तक्रारदारांना लोनसाठी कॉल दिल्लीतून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने दिल्लीतील हरिनगर, आनंद विहारच्या मॅक्सीमिसेर मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटे कंपनीच्या बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या कॉल सेंटरमधून पोलिसांनी शेहजाद रेहमान, अनुज रावत आणि मोहम्मद आमीर या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत ही टोळी कर्जाच्या नावाने अनेकांना कॉल करत होती. कर्जासाठी प्रोसेसिंग फीसह इतर कारणासाठी पैसे घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीची फसवणुक करत होती
तपासात ही बाब उघडकीस येताच या तिघांनाही अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी किल्ला कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लॅपटॉपसह 105 मोबाईल फोन जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात या मोबाईल फोनचा 132 हून अधिक गुन्ह्यांत वापर झाला असून त्यात कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोटिंग पोर्टलवर संबंधित मोबाईल क्रमांकाची तशी नोंद आहे. या टोळीने मुंबईसह दिल्ली आणि इतर शहरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.