मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – रस्त्याने पायी जाणार्या एका तरुणाला बेस्ट बसने जोरात धडक दिली. बसचा चाक डोक्यावरुन गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झा. सार्थक सूर्यकांत जंगम असे या मृत तरुणाचे नाव असून तो वरळीचा रहिवाशी आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळाहून पळून गेला असून त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बसचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात शुक्रवारी 25 एप्रिलला रात्री पावणेनऊ वाजता प्रभादेवी येथील अप्पासाहेब मराठे मार्ग, स्टॅण्डर्ट मिल बसस्टॉप, डिकॅथलॉन इमारतीसमोर झाला. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारा सार्थक हा डिलीव्हरी म्हणून कामाला होता. शुक्रवारी सायंकाळी पावणेनऊ वाजता डिकॅथलॉन इमारतीसमोरील रस्त्याने पायी जात होता. यावेळी चुन्नाभट्टी येथून वरळीच्या दिशेने जाणार्या 171 क्रमांकाच्या एसी बसच्या चालकाने त्याला जोरात धडक दिली. त्यात तो रस्त्यावर पडला आणि बसचा चाक त्याच्या डोक्यावरुन गेला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून अपघाताची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
सार्थकला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रावरुन त्याचे नाव सार्थक जंगम आणि तो वरळी कोळीवाडा, एस. बी काणे चाळीत राहत असल्याचे उघडकीस आले. ही माहिती नंतर त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. अपघातानंतर बसचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे पळून गेलेल्या बसचालकाविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.