रेस्ट्रॉरंट-सलोनमध्ये पार्टनरशीप ऑफर करुन दागिने पळविले

21 लाखांचे दागिने पळविणार्‍या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – रेस्ट्रारंट व सलोनच्या व्यवसायात पार्टनरशीपची ऑफर देताना व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका महिलेची सुमारे 21 लाखांचे दागिने घेऊन तिच्याच मित्राने पलायन केल्याची घटना शुक्रवारी वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. दागिने घेऊन पळून गेलेलया यश भाटिया या मित्राविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. तीन दिवसांत दोन वेळा झालेल्या भेटीत मित्राने विविध सोन्याचे दागिने, आयफोन घेऊन पलायन केल्याने तक्रारदार महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

42 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती, मुलगी आणि सासूसोबत वांद्रे येथील हिल रोडवर राहते. तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी तिला लाखो रुपयांचे स्त्रीधन म्हणून सोन्याचे दागिने दिले होते. तिच्या मोबाईलवर एक अ‍ॅप असून या अ‍ॅपच्या माध्यमातून तिची यश भाटिया या 25 वर्षांच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्याने तो मूळचा अहमदाबादचा रहिवाशी असून त्याचे काही नातेवाईक खार परिसरात राहतात. तो सध्या फ्रांसमध्ये राहत असून तिथेच त्याचा स्वतचा व्यवसाय आहे असे सांगितले. 23 एप्रिलला तो तिच्या वांद्रे येथील घराजवळ आला होता. त्यानंतर ते दोघेही एका कॅफेमध्ये गेले होते. तिथेच त्याने तिला त्याचा खार परिसरात रेस्ट्रारंट आणि सलोनचा व्यवसाय सुरु करण्याचा मानस असून त्यात त्याला पार्टनरची गरज आहे.

तिला पार्टनरशीप ऑफर करुन त्याने तिला व्यवसायात गुंतवणुक करण्याचा प्रपोजल दिला होता. या व्यवसायातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्यासोबत व्यवसाय सुरु करण्याचा तसेच त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी 25 एप्रिलला ते दोघेही पुन्हा वांद्रे येथील कॉपर चिमणी रेस्ट्रॉरंटमध्ये भेटले होते. तिच्याकडे गुंतवणुक करण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे तिने तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. रेस्ट्रॉरंटमध्ये येताना तिने तिचे सोन्याचे दागिने आणले होते. रेस्ट्रॉरंटनंतर ते दोघेही क्रोमा मॉलमध्ये गेले. तिथे तिने एक लॅपटॉप खरेदी केला हेता. त्यानंतर ते दोघेही तिच्या घराजवळ रिक्षाने आले होते.

तिचे विविध सोन्याचे दागिने, लॅपटॉप, आयफोन असा 21 लाख 47 हजाराचा मुद्देमाल यशकडे देऊन ती घरी गेली होती. काही वेळानंतर ती पुन्हा यशला भेटण्यासाठी आली होती, मात्र तिथे यश नव्हता. तो तिचे दागिने, लॅपटॉप आणि आयफोन घेऊन पळून गेला होता. तिने त्याला कॉल केला, मात्र त्याने तिचे कॉल घेतले नाही. तिने आजूबाजूला त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो पळून गेल्याची खात्री होताच तिने घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी यश भाटियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या यशचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page