मालाड-गोवंडी येथे चार तरुणांवर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – मालाड आणि गोवंडी येथील दोन घटनेत चार तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चारही तरुण गंभीरररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर सायन आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कुरार आणि शिवाजीनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
पहिली घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, पद्मानगर पॉवर हाऊसजवळ घडली. याच परिसरात 25 वर्षांचा मोहम्मद अमानउल्ला मोहम्मद तय्यब खान हा राहत असून त्याचा मोहम्मद सन्नाउल्ला सख्खा तर सद्दाम खान हा चुलत भाऊ आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजता सन्नाउल्ला हा कामावरुन घरी जात होता. यावेळी त्याला रमेश जैस्वाल भेटला होता. त्याने त्याच्याकडे उसने दिलेल्या पैशांची मागणी केली होती. त्याचा राग आल्याने त्याच्यासह रवी जैस्वालने त्याच्यावर बर्फ तोडण्याच्या टोच्याने प्राणघातक हल्ला केला होता. हा प्रकार मोहम्मद अमानउल्लासह त्याचा चुलत भाऊ सद्दाम खानला समजताच त्याने तिथे धाव घेऊन त्यांच्या भांडणात मध्यस्थी केली होती. भावाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांच्यावरही टोच्याने प्राघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते तिघेही जखमी झाले होते. या तिघांनाही नंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद अमानउल्ला याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रमेश आणि रवी जैस्वाल या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता मालाड येथील कुरार व्हिलेज, अप्पापाडा रिक्षा स्टॅण्डजवळील सायमन चिलो देशी बारसमोर घडली. या ठिकाणी एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान या घटनेनंतर मारेकरी पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.