पहलगाव हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

192 ठिकाणी कोंबिग ऑपरेशन तर 111 ठिकाणी नाकाबंदी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2025
मुंबई, – जम्मू-काश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले होते. यावेळी संपूर्ण शहरात 206 ठिकाणी कोम्बिंग ऑपेशन आणि 111 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईत दहाहून अधिक पाहिजे आणि फरारी आरोपींवर अटकेची तर 142 कलमांतर्गत 40 जणांवर कारवाई करण्यात आली. 7 हजार 235 वाहनांची तपासणी करुन 1 हजार 836 वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीमेतंर्गत 63 वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदा शहरात ऑल आऊट ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. शनिवारी रात्री अकरा वाजता सुरु करण्यात आलेली ही कारवाई रविवारी रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत सुरु होते. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा झोनल पोलीस उपायुक्त, 41 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिसांकडून 206 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहा फरारी आणि पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली तर 142 कलमांतर्गत चाळीसजणांवर कारवाई करण्यात आली होती. ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान अवैध शस्त्र, अंमली पदार्थ बाळगणार्‍या, जुगार आणि इतर अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आले. जवळपास 19 ठिकाणी ही कारवाई झाली होती. यावेळी 28 आरोपींवर अजामिनपात्र तर दोन आरोपींवर स्टॅडिंग वॉरंट बजाविण्यात आले. महाराष्ट्र-मुंबई पोलीस कायदा कलम 120, 122 कलमांतर्गत एकूण 64 जणांवर कारवाई करण्यात आली.

संपूर्ण मुंबई शहरात 111 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात 7 हजार 235 दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी तपासण्यात आले. 1 हजार 836 वाहन चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर 63 जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. मुंंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली होती तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणाची तपासणी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page