डोंगरीतील बारा लाखांच्या घरफोडीप्रकरणी दुकलीस अटक
दोन्ही आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – नेव्हल डॉकयार्डमधून निवृत्त झालेल्या वयोवृद्धाच्या डोंगरीतील राहत्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या दुकलीस डोंगरी पोलिसांनी अटक केली. नितीन रामचंद्र चिवीलकर आणि अरबाज समीर मंसुरी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिने जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत शाकीर ऊर्फ गुड्डू हैदर शेख या आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
सुरेंद्र गोविंद जासुद हे ६३ वर्षांचे वयोवृद्ध डोंगरीतील उमरखाडी, ऍड आनंद सुर्वे मार्गावरील ओमकार निवास इमारतीमध्ये राहतात. २०१९ साली ते नेव्हल डॉकयार्ड येथून निवृत्त झाले आहेत. १ जानेवारी २०२३ रोजी ते त्यांच्या पत्नी, दोन मुली आणि भावासोबत त्यांच्या रायगड येथील मुरुड, नांदगावी गेले होते. २३ जानेवारीला गावी असताना त्यांना त्यांच्या शेजारी राहणार्या स्वाती विवेक खोत यांचा फोन आला होता. तिने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तुटलेले असून त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी त्यांचा भाचचा विशाल विनायक मुरकुटे याला घरी पाठविले होते. घरी गेल्यानंतर त्याला अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये घुसून चोरी केल्याचे दिसून आले. कपाटातील विविध सोन्या-चांदीचे दागिने, ५० हजार रुपयांची कॅश असा १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला होता. त्यानंतर त्यांनी डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान नितीन चिवीलकर आणि अरबाज मंसुरी या दोघांना चेंबूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. चौकशीत त्यांनी सुरेंद्र जासुद यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांचा ताबा डोंगरी पोलिसांनी घेतला होता. चौकशीत त्यांनी शाकीर ऊर्फ गुड्डू याच्यासोबत ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील नितीन हा वसई तर अरबाज हा जालनाचा रहिवाशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिने जप्त केले आहेत. या गुन्ह्यांत शाकीर फरार असल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तिन्ही आरोपी घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.