मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – अंधेरीतील एका पॉश अपार्टमेंटमधील एका बॅगेत बॉम्ब असल्याचा गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक कॉल प्राप्त झाला होता. चौकशीअंती ऑटिझमच्या आजाराने त्रस्त असलेल्या 19 वर्षांच्या तरुणाने हा कॉल केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पालकांच्या चौकशीतून आजारी तरुण काहीही बडबड करत असून त्यातूनच त्याने कंट्रोल रुमला कॉल करुन ही माहिती दिली होती. दरम्यान बॉम्बच्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महिला पोलीस शिपाई पाटील या मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कार्यरत असून गुरुवारी त्यांची नाईट शिफ्ट होती. त्या रात्री कर्तव्यावर असताना दोन वाजता एका तरुणाने कंट्रोल रुमला कॉल केला होता. या तरुणाने अंधेरीतील मरोळ पाईपलाईनजवळील मुकूंदनगर हॉस्पिटल, अनमोल अपार्टमेंटमध्ये एक बॅग ठेवली असून त्यात बॉम्ब किंवा फायर आहे. या बॅगेला येथून घेऊन जा असे सांगून कॉल बंद केला होता. बॅगेत बॉम्ब असल्याचा कॉल प्राप्त होताच पाटील यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली होती.
हा कॉल अंधेरी परिसरातून आला होता. त्यामुळे ही माहिती नंतर सहार पोलिसांना देऊन बॅगेची तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यता आले होते. ही माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गावडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती, मात्र तिथे पोलिसांना कुठलीही संशयित बॅग सापडली नाही. कॉलवरुन संबंधित व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. यावेळी तो कॉल एका 19 वर्षांच्या तरुणाने केला होता.
हा तरुण ऑटिझम या आजाराने त्रस्त असून त्याला काहीही बडबड करण्याची सवय आहे. अनेकदा तो काहीतरी बडबड करतो. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या पालकाच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी बॉम्बचा कॉल आल्याची नोंद केली होती. आरोपी मुलगा आजारी असल्याने त्याच्या पालकांना योग्य ती समज देण्यात आली आहे.