अडीच कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
व्यवसायासासह बटर व दूध पावडरच्या पेमेंटचा अपहार करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – अडीच कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आनंद सतीश लोखंडे या विद्यानंद डेअरीचे संचालक असलेल्या व्यावसायिकाविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायासह बटर आणि दूध पावडरच्या पेमेंट अपहार करुन त्याने एका खाजगी दूध कंपनीची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीनंतर आनंद हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गुरुप्रित जितेंद्र सिंग हे व्यावसायिक असून अंधेरी परिसरात राहतात. ते बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत संचालक म्हणून काम करत असून या कंपनीचे अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक कार्यालय आहे. कंपनीमार्फत दूधासह दूधाच्या पदार्थाचे खरेदी करुन त्याची विक्री केली जाते. 2023 साली ही कंपनी सुरु करण्यात आली असून कंपनीचे कोणतेही प्लांट नाही. त्यांची कंपनी मिल्क फेश अॅग्रो, महालक्ष्मी मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडेक्टसह इतर कंपन्यांकडून ताजे दूध आणि दूधाचे पदार्थ घेऊन ते ब्रिटानिया, सोनाई डेअरी, नेचर डिलाईट, सिन्नर दूध संघ आदी मोठ्या कंपन्यांना त्याची विक्री करते.
डिसेंबर 2023 कंपनीचे मुख्य फायानान्सियल अधिकारी रौनक वसंदानी हे पुण्यातील एका हॉटेलमध्ये कंपनीच्या कामासाठी गेले होते. तिथेच त्यांची विद्यानंद डेअरीचे संचालक आनंद लोखंडे यांच्याशी ओळख झाली होती. त्याने त्याचा दूधाचा साठा करण्याचा मोठा व्यवसाय असून ते अनेकांना दूधाची बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री करतात असे सांगितले. यावेळी त्याने महाराष्ट्रातील नामांकित दूध व्यावसायिक आणि त्यांच्या कंपनीचे नावे घेऊन त्याची अनेकांशी चांगले संबंध असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीकडून दूध घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे आनंद लोखंडे यानेही त्यांच्या कंपनीला दूध पुरवठा सुरु केला होता. मार्च 2024 रोजी त्यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशीपची ऑफर दिली होती. दूधाच्या विक्रीतून त्यांच्या कंपनीला तीस टक्के कमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्यांना एक कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यास सांगितले होते.
त्याच्यावर विश्वास ठेवून गुरुप्रित सिंग यांनी त्याच्या कंपनीसोबत पार्टनरशीप करार करुन एक कोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. या करारानंतर काही महिने त्याने तीस टक्के कमिशनची रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान त्याने त्यांच्या कंपनीकउून विक्रीसाठी 75 टन बटर विकत घेतले होते. तसेच त्याला 15 टन दूध पावडरची ऑर्डर दिली होती. बटरसाठी त्याच्या कंपनीला त्याने 1 कोटी 16 लाख रुपयांचे पेमेंट न देता तसेच दूध पावडरसाठी 32 लाख रुपयांचे पेमेंट घेऊन दूध पावडरचा पुरवठा केला नव्हता. व्यवसायात गुंतवणुकीसह बटर आणि दूध पावडरसाठी 2 कोटी 48 लाख 89 हजार 832 रुपये आनंद लोखंडे यांच्याकडून येणे बाकी होते.
मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत पेमेंट न मिळाल्याने त्यांच्या कंपनीने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. चौकशीअंती आनंदशी कुठल्याही दूध संघासोबत दूध खरेदी-विक्रीचा व्यवहार केला नव्हता. त्यांच्या कंपनीच्या बिलाचा फसवणुकीसाठी वापर करुन संबंधित कंपनीसह त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच गुरुप्रित सिंग यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आनंद लोखंडे याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्यावसायिक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.