गोरेगाव येथे दोन गटातील राड्यानंतर 53 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येसह हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्ह्यांत पाचजणांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – अनधिकृत बांधकामावरुन झालेल्या राड्यानंतर एका गटाने दुसर्या गटातील फुरखान खान या 53 वर्षांच्या व्यक्तीची तलवारीसह लाकडी स्टिक, लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करुन हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन्ही गटातील पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरे पोलिसांनी दंगलीसह हत्या, हत्येचा प्रयत्नाच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती. हत्येच्या गुन्ह्यांत आफरीन अझरुद्दीन शेख आणि रझिया साकीर बेगम शेख तर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत राजेश अरुण वाघमारे, नितेश तिसाराम पाल आणि अरबाज फुरखान खान अशा पाचजणांना आरे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन गटातील राडा आणि त्यातून झालेल्या हत्येच्या घटनेने गोरेगाव परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तिथे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
ही घटना गुरुवारी 1 मेला रात्री साडेअकरा वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनी, मांडवा झोपडपट्टी, युनिट क्रमांक 32, सिद्धार्थ रहिवाशी संघात घडली. यातील पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार अरबाज फुरखान खान हा मालाडच्या पिंपरीपाडा, शिवशंकर चाळीत राहत असून हत्या झालेले फुरखान हे त्याचे वडिल आहेत. सिद्धार्थ रहिवाशी संघात काही स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामावरुन तिथे दोन गट निर्माण झाले होते. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी साईबाबा मंदिरासमोर अरबाज, त्याचे वडिल फुरखान, मोठा भाऊ सुफियान, सावत्र भाऊ राजेश वाघमारे, सनीराम, नितेश पाल असे सर्वजण अनधिकृत बांधकामाविषयी विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी दुसर्या गटातील लोकांशी त्यांचा शाब्दिक वाद झाला होता.
या वादानंतर त्यांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, लाकडी स्टिक आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात फुरखान आणि अरबाज खान हे दोघेही जखमी झाले होते. या घटनेनंतर या गटाने मारहाण करणार्या दुसर्या गटातील पाच ते सहाजणांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात अझरुद्दीन शेख, त्याचा भाऊ जोहरुद्दीन शेख, रजिया शेख आणि आफरीन शेख असे एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. या राड्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाजणांना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर आणि कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या फुरखान खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अरबाजला उपचारानंतर सोडून देण्यात आले. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या दोघांवर उपचार सुरु असून दोन्ही महिलांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी अरबाज खान आणि आफरीन शेख यांनी एकमेकांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध दंगलीसह हत्या, हत्येचा प्रयत्नासह भारतीय न्याय सहितेच्या अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात हत्येच्या गुन्ह्यांत आफरीन व तिची सासू रजिया शेख या दोघींना तर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत राजेश वाघमारे, नितेश पाल आणि अरबाज खान या तिघांना आरे पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत सनी रामला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.