श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरातील चोरीचा पर्दाफाश
चोरीच्या मुद्देमालासह तीन गुन्हेगारांना गुजरात येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – शिवडीतील श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात अखेर रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चोरीच्या मुद्देमालासह तीन गुन्हेगारांना गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. सुनिलसिंह सुरजसिंह ाभी, राहुलसिंह प्रविणसिंह वाघेला आणि जिगरसिंह दिनेशसिंह वाघेला अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गुजरातचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना 22 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री शिवडीतील ए. डी मार्ग, मूळराज भवन इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील श्री शिवरी जैन संघाच्या मंदिरात घडली होती. 57 वर्षांचे बिपीन छगनलाल लालन हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवडी परिसरात राहतात. शिवडी येथे श्री शिवरी जैन संघ नावाची एक ट्रस्ट असून या ट्रस्टच्या मालकीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या ट्रस्टमध्ये ते सभासद म्हणून काम पाहतात. मंदिरात हितेंद्रसिंह देवेंद्रसिंह परमार हे पुजारी म्हणून काम करतात. सकाळी साडेपाच वाजता मंदिर उघडल्यानंतर हितेंद्रसिंह हे साफसफाई करुन तिथे पूजा करतात. दिवसभर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी असून रात्री आठ वाजता मंदिर बंद केले जाते.
23 एप्रिलला सकाळी हितेंद्रसिंह हे नेहमीप्रमाणे मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार ट्रस्टच्या सभासदांना सांगितला. त्यांनी मंदिराची पाहणी करुन सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी त्यांना सीसीटिव्ही कॅमेर्याचे डीव्हीआर मेन वायर कट झालेली दिसली. मंदिरातील दानपेटी उघडी दिसली. अज्ञात व्यक्तीने रात्री उशिरा मंदिराच्या खिडकीतून आत प्रवेश केला होता. त्यानंतर मंदिरातील देवतांच्या मूर्तीवरील विविध सोन्याचे दागिने, त्यात सोन्याचा टिका, कपटी, चांदीचे मुकूट, दानपेटीतील कॅश आदीचा समावेश होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बिपीन लालन यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मंदिरातील चोरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी चोरीनंतर गुजरातला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त आर रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक संदीप ऐदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, गोविंद खैरे, सहाय्यक फौजदार सुरेश घार्गे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, ज्ञानेश्वर केकाण, काशिनाथ शिवमत, कमलेश शेडगे, पोलीस शिपाई समिकांत म्हात्रे, किरण देशमुख, निखील राणे, जितेंद्र परदेशी, पोलीस हवालदार गोविंद ठोके आदीचे एक पथक गुजरातला पाठविण्यात आले होते.
या पथकाने दांतीवाडा पोलिसांच्या मदतीने सलग तीन दिवस साध्या वेशात पाळत ठेवून सुनिलसिंह दाभी, राहुलसिंग वाघेला आणि जिगरसिंह वाघेला या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली देताना चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.