अदिदास-नाईक कंपनीच्या बोगस शूज व चप्पल विक्रीप्रकरणी चौघांना अटक
कुर्ल्यातील सात दुकानात गुन्हे शाखेची कारवाई; १.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – अदिदास आणि नाईक कंपनीच्या बोगस शूज आणि चप्पल विक्री करुन ग्राहकासह कंपनीची फसवणुक करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन चार व्यापार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश छाजीलाल जयस्वाल, युवराज सुरेश अहिरे, प्रसाद नरसिंगराव चिंताक्रिदी आणि किशोर श्रवण अहिरे अशी या चौघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी अदिदास आणि नाईक कंपनीच्या १ कोटी २७ लाख ४१ हजार रुपयांच्या बोगस १ हजार ११० शूज आणि चप्पलचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नरेंद्रसिंग सोवरनसिंग फौजदार हे एका खाजगी कंपनीचे प्रतिनिधी असून त्यांना कॉपीराईट व ट्रेडमार्क ऍक्टनुसार भारतात कोणत्याही ठिकाणी अदिदास आणि नाईक कंपनीच्या बोगस शूज आणि चप्पल तयार करणार्या किंवा विक्री करणार्या ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील काही दुकानातून त्यांच्या कंपनीच्या बोगस शूज आणि चप्पलची विक्री करुन काही व्यापारी त्यांच्या कंपनीसह शासनाचा महसूल बुडवत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गुन्हे शाखेत कंपनीच्या वतीने तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अजीत गोंधळी, सुनिता भोर, येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, बेंडाले यांच्यासह अंमलदारांनी कुर्ला येथील सात दुकानात एकाच वेळेस कारवाई केली होती. त्यात शू एक्सप्रेस, योगेश फुट वेअर, उमेश फुट वेअर, प्रकाश शूज मार्ट, कृष्णा फुट वेअर आणि ए. के शूज या दुकानाचा समावेश होता. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या बोगस शूज आणि चप्पल विक्री करणार्या चार व्यापार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सातही दुकानातून पोलिसांनी १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दुकानात अन्य कंपन्यांचे शूज विक्रीसाठी ठेवले होते. तेदेखील बोगस आहे का याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
चौकशीत यातील योगेश जसस्वाल आणि किशोर अहिरे यांच्याविरुद्ध २०२० रोजी अशाच प्रकारे कारवाई झाली होती. या गुन्ह्यांत ते दोघेही जामिनावर आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर या दोघांनी पुन्हा बोगस शूज आणि चप्पल विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. आरोपी कमी किंमतीत बोगस शूज खरेदी करुन ते कंपनीचे शूज असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणुक करत होते. अशा प्रकारे त्यांनी कंपनीसह शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचे पोलिसांनी सांगितले. या चारही आरोपीविरुद्ध भादवीसह कॉपीराईट कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.