मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या सात विविध गुन्ह्यांत बारा आरोपींना मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सोळा किलो वजनाचे एमडी, हेरॉईन आणि गांजाचा साठा जप्त केला असून त्याची ३ कोटी २६ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. या सर्व आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरात ही कारवाई अंधेरीतील सहार गाव, नालासोपारा, सांताक्रुज, डोंगरीतील दोन टाकी, कुर्ला, बोरिवली आणि भायखळा परिसरात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी अंधेरी येथून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्जची किंमत सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या दोन सहकार्यांना नालासोपारा येथून ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसांनी ३५ लाख रुपयांचे १७५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. अशा प्रकारे दोन्ही कारवाईत पोलिसांनी एका विदेशी नागरिकासह तिघांना अटक करुन त्यांच्याकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे ६७५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या आरोपींमध्ये एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात सात तर मालवणी पोलीस ठाण्यात एक अशा आठ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई सहार पोलिसांकडून करण्यात आली होती. अन्य एका कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी डोंगरीतील चावल गल्ली आणि दोन टाकी परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाख रुपयांचे साठ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. दुसर्या कारवाईत घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अंधेरीतील एम. ए रोडवर गांजाचा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३२८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन, १४ किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये इतकी होती. अटक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध डी. एन नगर गुन्हे शाखा, ऍण्टी नारकोटीक्स सेल आणि सहार पोलीस ठाण्यात पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. २०११ साली त्याला वरळी युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली होती. याच गुन्हयांत त्याला बारा वर्षांच्या कारासासह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तो शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याला पुन्हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अन्य एका कारवाईत घाटकोपर युनिटने कुर्ला येथून २० मार्च २०२४ रोजी गस्तदरम्यान एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २० लाखाचे शंभर ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते.
तिसर्या कारवाईत वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून १०५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे २१ लाख रुपये होती. चौथ्या कारवाईत वरळी युनिटच्या अधिकार्यांनी भायखळा येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीस अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तेरा लाख रुपयांचे ६५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले होते. पाचव्या कारवाईत कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी सॅनिक ज्येरी ओकासोर या २० वर्षांच्या नायजेरीयन तरुणाला गस्तदरम्यान ताब्यात घेतले होते. तो बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नॅशनल पार्कजवळ एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आली होती. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी २३ लाख रुपयांचे ११५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले. अशा प्रकारे एकूण सात कारवाईत पोलिसांनी २ कोटी २४ लाख रुपयांचे १ किलो १२० ग्रॅम वजनाचे एमडी, ९८ लाख ४० हजार रुपयांचे ३२८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि ४ लाख २० हजार रुपयांचा १४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण १५ किलो ७४८ ग्रॅम वजनाचे ३ कोटी २६ लाख ६० हजार रुपयांचा ड्रग्ज साठा आणि कॅश जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच मार्गदर्शनाखाली आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार, वरळी युनिटचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक रुपेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
२०२३ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने एकूण १०६ ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांत पोलिसांनी २२९ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून ५३ कोटी २३ लाख रुपयांचा विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता. तसेच २०२४ साली आतापर्यंत पोलिसांनी सतराहून अधिक गुन्ह्यांची नोंद करुन ४३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० किलो ८४३ ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत २३ कोटी ५९ लाख रुपये इतकी आहे. या ड्रग्जसहीत आरोपींकडून पोलिसांनी ४ लाख ५ हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे.