गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची सतरा लाखांची फसवणुक
कापड व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – गार्मेट व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून मिरारोडच्या एका व्यावसायिकाची त्याच्या कापड व्यापारी मित्राने सुमारे सतरा लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून कांदिवली पोलिसांनी धर्मेश सांघवी या कापड व्यापार्याचा शोध सुरु केला आहे.
42 वर्षीय संजीव प्रसाद मिश्रा यांचा शेअर मार्केटशी संबंधित व्यवसाय असू ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोड येथील शांतीनगर, सेक्टर आठमध्ये राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांची धर्मेशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. या ओळखीनंतर त्यांना धर्मेशचा गार्मेटचा व्यवसाय असल्याचे समजले होते. त्यांनीही त्यांना या व्यवसायात प्रचंड फायदा असून त्यात त्यांनी गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
काही दिवसांत धर्मेशसोबत कौटुंबिक संबंध निर्माण झाल्याने त्यांनी त्याच्यासोबत गार्मेट व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर 2021 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत त्यांनी त्याच्याकडे सतरा लाख दहा हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्याने त्यांना चार वर्षांत कुठलाही परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे व्यवसायात गुंतवणुक केलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती, मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी धर्मेश सांघवी याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. धर्मेशवर व्यवसायात गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.