आरटीओ अधिकार्‍यासह दोघांना कारावासाची शिक्षा

दिड हजाराच्या लाचप्रकरणी कारवाई झाली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – दिड हजाराची लाचप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या अंधेरीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र एकनाथ नेरकर आणि खाजगी इसम जयप्रकाश मोरेश्वर दळवी या दोघांना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजेंद्र नेरकर यांना चार वर्षांचा सश्रम कारावासासह 50 हजार रुपयांच्या दंडाची तर जयप्रकाशला तीन वर्षांच्या कारावासासह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यातील तक्रारदाराचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून 17 एप्रिल 2014 रोजी अंधेरीतील प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या मालकीची एक बस ताब्यात घेतली होती. बसचा टॅक्स न भरल्याने त्यांना मेमो देण्यात आला होता. यासंदर्भात त्यांनी राजेंद्र नेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी नेहमीप्रमाणे करावे लागेल असे सांगितले. नेहमीप्रमाणे करावे लागेल याचा अर्थ राजेंद्र नेरकर यांना लाच द्यावी असे असे तक्रारदारांना माहिती होते. त्यांना दंडाची अडीच हजार आणि लाचेची दोन हजार रुपये देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात राजेंद्र नेरकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 19 एप्रिल 2014 रोजी तक्रारदार दीड हजार रुपयांची लाच देण्यासाठी राजेंद्र नेरकर यांच्याकडे गेले होते. मात्र त्यांनी ही रक्कम जयप्रकाश दळवी यांना देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी जयप्रकाश दळवी याला लाचेची रक्कम दिली होती. यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने ही लाच राजेंद्र नेरकर यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर राजेंद्र यांना याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत या दोघांविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. आरोपपत्रानंतर खटल्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु होती.

या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने दोघांनाही दोषी ठरविले होते. त्यानंतर या दोघांना वेगवेगळ्या कारावासासह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याा गुन्ह्यांचा तपास निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, इरफान गुलाम शेख यांनी केला तर सरकारी वकिल म्हणून प्रभाकर तरंगे यांनी काम पाहिले होते.

अटकेनंतर त्यांच्या राहत्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या कारवाईत त्यांच्याकडे सुमारे 84 लाखांची कॅश सापडली होती. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करताना कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याकडे 1 कोटी 16 लाखांची मालमत्ता सापडली होती. ही संपत्ती त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा अधिक होती. त्यामुळे राजेंद्रसह त्यांची पत्नी प्रतिभा राजेंद्र नेरकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page