लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची 27 लाखांची फसवणुक

आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मे 2025
मुंबई, – लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणींना लग्नासाठी प्रपोज करुन विविध कारण सांगून त्यांची फसवणुक करणार्‍या निखील दिपक दळवी या भामट्याविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निखीलने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून आतापर्यंत 27 लाख 40 हजार रुपये उकाळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून घातल्याचे बोलले जाते. निखिलला अशाच एका गुन्ह्यांत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत त्याचा लवकरच पोलिसाकडून ताबा घेतला जाणार आहे.

28 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची पुण्याच्या हडपसरची रहिवाशी असून सध्या विक्रोळी येथे राहते. पुण्यात तिचे आई-वडिल राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला असल्याने विक्रोळी येथे भाड्याच्या रुममध्ये राहते. दोन वर्षांपूर्वी तिने लग्न जुळविणार्‍या एका खाजगी संकेतस्थळावर लग्नासाठी स्वतचे नाव नोंदविले होते. तिथे तिची 31 वर्षांच्या निखिल दळवीशी ओळख झाली होती. निखिलने तो घाटकोपर येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून गुगलमध्ये कामाला आहे. त्याला वार्षिक एक कोटीचे पॅकेज असून त्याला चांगल्या पार्टनरची गरज असल्याचे सांगितले होते. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा चॅट आणि मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते.

काही दिवसांनी त्याने तिला त्याचे गावचे घर रस्ता रुंदीरपणात जाणार आहे. गावच्या घरासाठी त्याला तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे आर्थिक मदत मागितली होती. त्याची ऑनलाईन फसवणुक झाली असून त्याचे बँक खाते फ्रिज झाले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला बँक खात्याचा स्क्रिनशॉट पाविले होते. त्यात त्याच्या बँक खात्यात 78 लाख 89 हजार 825 रुपये शिल्लक असल्याचे दिसत होते. इतकेच नव्हे तर त्याने तिला तो गुगलमध्ये कामाला असल्याचा आयकार्ड व्हॉटअपवर पाठविले होते. अल्पवधीत तो तिचा चांगला मित्र झाल्याने तिने त्याला सत्तर हजार रुपये दिले होते. चौदा दिवसांत त्याने तिला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यानंतर त्याने तिच्याकडे जर्मनीला जायचे आहे, गावच्या घराचे बांधकाम करायचे आहे, जर्मनीवरुन येताना मुंबई एअरपोर्टवर कस्टमने पकडले असून त्याच्याकडे दोन आयफोन सापडले आहे. ते सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली. तिनेही त्याला प्रत्येक वेळेस पैशांची मदत केली होती.

काही दिवसांनी त्याने त्याच्या घराचे इंटीरियरचे काम करायचे आहे असे सांगून तिच्याकडे 21 लाखांची मागणी केली होती, मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने त्याने तिला बँकेत कर्ज करण्यास प्रवृत्त केले होते. कर्जाचे हप्ते तो भरणार असल्याचे सांगून तिच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे तिने त्याला बँकेतून कर्ज काढून पैसे दिले होते. अशा प्रकारे तो तिच्याकडे सतत विविध कारण सांगून पैशांची मागणी करत होता, त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही त्याला प्रत्येक वेळेस आर्थिक मदत केली होती. काही दिवसांपूर्वी तिने त्याला त्याच्या गुगल कार्यालयातील फोटो पाठविण्यास सांगितले, मात्र त्याने तिला फोटो पाठविले नाही. अशा प्रकारे फोटो काढण्याची परवानगी नाही असे सांगून तो तिला टाळत होता. मात्र त्याने तिच्याकडे सतत पैशांची मागणी सुरुच ठेवली होती.

5 सप्टेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत त्याने त्याच्या बँक खात्यात 21 ऑनलाईन व्यवहार केले होते. त्यात तिने त्याला 27 लाख 40 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नासाठी प्रपोज करुन ऑक्टोंबर 2024 रोजी तिच्या आई-वडिलांकडे पुण्यात लग्नाची बोलणी करण्यासाठी आला होता. त्याच्या घराचे काम सुरु असून ते काम संपल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना भेटून पुढील चर्चा करु असे सांगितले होते. जानेवारी महिन्यांत तिला एका तरुणीचा फोन आला होता. ही तरुणी नवी मुंबईतील कामोठे, सेक्टर 36 मध्ये राहत असून तिची ओळख याच संकेतस्थळावर निखील दळवीशी झाी होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज करुन तिच्याकडे सतत पैशांची मागणी केली होती. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचे सांगितले.

ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने निखिलला याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने तिच्याकडून पैसे घेतल्याची कबुली दिली, तिला तिचे सर्व पैसे दिले आहेत. तिला लग्नाचे आश्वासन कधीच दिले नव्हते. तो फक्त तिच्याशी लग्न करणार आहे असे सांगू लागला. मात्र या तरुणीने निखील खोटे बोलत असून तिचे पैसे त्याने अद्याप दिले नाही. त्याच्याविरुद्ध तिने पोलिसांत तक्रार केल्याचे सांगून तिला निखिलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. निखीलकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निखिल दळवीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असून निखिलची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे. निखिलने लग्नाचे आमिष दाखवून अशाच प्रकारे इतर काही तरुणींची फसवणुक केल्याचे बोलले जाते. चौकशीदरम्यान त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याचा ताबा घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्याच्या अटकेने त्याने आतापर्यंत किती तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घातला आहे याचा खुलासा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page