बोरिवली-विक्रोळीतील अपघातात तिघांचा मृत्यू

टँकरचालकास अटक तर दोन चालकाचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मे 2025
मुंबई, – बोरिवलीसह विक्रोळीतील तीन अपघाताच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोघांची ओळख पटली तर एकाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांमध्ये अक्षतसिंग रणजीतसिंग बिष्ट आणि राहुल कृष्णनाथ तोडणकर यांचा समावेश असून यातील अक्षतसिंग हा एका टॅटू पार्लरमध्ये मॅनेजर तर राहुल हा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कामाला होते. तिसर्‍या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला असून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि विक्रोळी पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका टॅकरचालकास अटक केली तर इतर दोन चालक अपघातानंतर पळून गेले आहेत. या दोघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एन. एल पार्कसमोरील एम. के बेकरीजवळील उत्तर वाहिनीवर झाला. दिपीका प्रसाद पिंगुळकर या शिक्षिका असून चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहतात. त्यांचा पती प्रसाद यांचा कन्सल्टिंग व्यवसाय असून दोन मुले सध्या शाळेत शिकतात. राहुल तोडणकर हा त्याचा भाऊ असून तो कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहतो. सध्या तो फ्लीट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर काम करत होता. सुट्टी असल्याने तो त्याच्या घरी आला होता. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता तो त्याच्या बाईकवरुन बोरिवली येथे त्याचे पार्सल आणण्यासाठी जात होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका टँकरने त्यांच्या बाईकला मागून जोरात धडक दिली होती. त्यात चाकाखाली आलयाने राहुल हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या राहुल यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करणयात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दिपीका पिंगुळकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टँकरचालक प्रविणभाई सोमाभाई पागी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. प्रविणभाई हा गुजरातचया महल, मोरवा हडफचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोरिवलीतील दुसर्‍या अपघातात अक्षतसिंह बिष्ट या 23 वर्षांचा तरुणाचा मृत्यू झाला. अक्षतसिंह हा मिरारोडच्या गौरव रेसीडेन्सी, एव्हरशाईन पाईन, बेवली पार्क परिसरात राहत होता. गेल्या आठवड्यात तो मालाड येथील एका टॅटू पार्लरमध्ये मॅनेजर म्हणून कामाला लागला होता. रविवारी दोन वाजता तो बोरिवलीहून घराच्या दिशेने जात होता. त्याची बाईक बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस, एम. के बेकरीजवळील उत्तर वाहिनीवरुन जात असताना अज्ञात चालकाने भरवेगात वाहन चालूवन त्याच्या बाईकला धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा साडेपाच वाजता निधन झाले. याप्रकरणी अक्षतसिंगचा भाऊ निरज बिष्ट याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळाहून पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसाकडून शोध घेत आहेत.

विक्रोळी येथे अन्य अपघातात एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती विक्रोळीतील भांडुप डंपिंग रोड ते कांजूरमार्गदरम्यान जात असताना भरवेगात जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच गस्त घालणार्‍या विक्रोळी पोलिसांनी जखमी व्यक्तीला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. अपघातानंतर कारचालकाने जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पलायन केले होते. त्यामुळे या कारचालकाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page