कोरोना काळात झालेल्या खिचडी वाटपात 14.57 कोटीचा घोटाळा
ईडीनंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून आठ आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मे 2025
मुंबई, – कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या खिचडी घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र सादर झाल्यानंतर आता याच प्रकरणात 14 कोटी 57 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप करुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आठ आरोपीविरुद्ध शुक्रवारी किल्ला कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार सुनिल रामचंद्र कदम ऊर्फ बाळा कदम, राजीव नंदकुमार साळुंखे, सुजीत मुकूंद पाटकर, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार संजय चंद्रकांत माशिलकर, प्रांजल संजय मशिलकर, प्रितम संजय मशिलकर, सुरज सतीश चव्हाण, अमोल गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे. या आरोपपत्रात संबंधित आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून खिचडीचे वाटप करण्यात आले होते. त्यासाठी विविध 52 खाजगी कंपन्यांना खिचडीचे कंत्राट देण्यात आले होते. चार महिन्यांत संबंधित कंपन्यांना सुमारे चार कोटीचे वाटप करण्यात आले होते. खिचडी वाटपात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा तसेच मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीकडून तर आर्थिक घोटाळाप्रकरणी दोन वर्षापूर्वी गोपाळ पांडुरंग लावणे यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने 406, 420, 465, 468, 471, 120 बी, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु करुन या घोटाळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या वैष्णवी किचन, सह्याद्री रिफ्रेशमेंट, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसशी संबंधित संचालकांसह कंपनीशी संबंधित पोलिसांनी चौकशी केली होती. त्यात एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत या आरोपींनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून संगनमत करुन मनपाच्या खिचडी वाटपाचे पात्रता निकषांमध्ये बसत नसलेले तसेच 300 ग्रॅम खिचडी पॅकेट द्यायचे आहे हे माहित असताना गैरमार्गाने खिचडी वाटपाचे कार्यादेश प्राप्त करुन मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केल्याचे उघडकीस आले होते. 100 ते 200 ग्रॅम खिचडी पॅकेटसाठी 22 ते 24 रुपे प्रती पॅकेटचे दर ठेवण्यात आले होते. मात्र मनपाकडून त्याच पॅकेटसाठी 33 रुपये प्रति पॅकेट अधिक जीएसटी याप्रमाणे रक्कम घेण्यात आली होती.
संजय मशिलकर, प्रांजल मशिलकर, प्रितम मशिलकर यांनी संगनमत करुन स्नेहा कॅटरर्सचे संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेताना मनपाला खिचडी वाटप योजनेविषयी कुठलीही माहिती दिली नव्हती. त्यांचा खाद्यपदार्थ आणि आरोग्य परवाना वापरुन खिचडी वाटप योजनेसाठी पात्र नसलेले माहिती असताना मनपाकडून सुरज चव्हाण, अमोल किर्तीकर यांच्या मदतीने खिचडी वाटपाचे कार्यादेश प्राप्त केले होते.
तपासात वैष्णवी किचन-सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार सुनिल कदम राजीव साळुंखे, सुजीत पाटकर आणि फोर्स वन मल्टी सव्हिसेसचे भागीदार संजय मशिलकर, प्रांजल मशिलकर, प्रितम मशिलकर, सुरत चव्हाण, अमोल किर्तीकर यांनी कोरोना काळात एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत खिचडी वाटपात 14 कोटी 57 लाखांचा गैरलाभ प्राप्त केला होता. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच संबंधित आठही आरोपींविरुद्ध शुक्रवारी किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपीविरुद्ध नंतर पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.