मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मे 2025
मुंबई, – पोलीस ठाण्यासमोरच जोरजोरात शिवीगाळ करुन धिंगाणा घालणार्यांना शांत राहण्यास सांगितले म्हणून तिघांनी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करुन मारहाण आणि धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अजिजुल सिराजुल शेख, नूरअली मेहरअली शेख आणि सैफुद्दीन शाहिद शेख अशी या तिघांची नावे असून या तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. पायधुनी पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
इरफान मंसुर सय्यद हे वरळीतील पोलीस वसाहतीत राहत असून सध्या पायधुनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी ते रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री पावणेअकरा वाजता पोलीस ठाण्याच्या समोरच अजिजुल शेख, नूरअली शेख आणि सैफुद्दीन शेख हे तिघेही आपसांत वाद घालून भांडण करत होते. ते तिघेही जोरजोरात शिवीगाळ करत असल्याने त्यांना इरफान सय्यद यांनी शांत राहण्यास सांगितले. यावेळी या तिघांनी गणवेशात असलेल्या इरफान यांना अश्लील शिवीगाळ करुन तू कोन आहेस, आम्हाला शिकवू नकोस, चल इथून जा नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.
इतकेच नव्हे तर त्यांना धक्काबुक्की करुन बघून घेण्याची धमकी देत त्यांच्या उजव्या हातावर जोरात फटका मारला, त्यांचा गळा पकडून धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन शूटींग करुन देखो पोलीस कसे पळतात असे दाखवून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात पोलीस नाही. त्यामुळे इथेच त्याचे हातपाय तोडून टाक धमकीवजा इशारा केला होता. या प्रकारानंतरही इरफानने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तिघेही त्यांना सतत धक्काबुक्की, शिवीगाळ करुन धमकी देत होते. या प्रकारानंतर इरफान सय्यद यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अजिजुल शेख, नूरअली शेख आणि सैफुद्दीन शेख या तिघांविरुद्ध कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकार्याला शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करुन धमकी देणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.