सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी ऑफिस बॉयला अटक
एप्रिल महिन्यांत टप्याटप्याने 36 लाखांचे दागिने चोरीची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी आशिष रामआशिष तिवारी नावाच्या एका ज्वेलर्स शॉपच्या ऑफिस बॉयला एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. एप्रिल महिन्यात आशिषने शॉपमधून सुमारे 36 लाखांचे चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.
किशनलाल सोहनलाल राठोड हे ज्वेलर्स व्यापारी असून ते भुलेश्वर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे झव्हेरी बाजार येथील चंप्पागल्लीत रुचिता ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. त्यांच्या दुकानात पाच कर्मचारी कामाला असून गेल्या सात वर्षांपासून आशिष तिवारी हा तिथे ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. 29 एप्रिलला आशिष हा नेहमीप्रमाणे शॉप बंद करुन घरी जात ोता. यावेळी त्याच्यावर किशनलाल राठोड यांचा जावई केतन सुरेश जैन यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली होती. यावेळी त्याच्या बॅगेत एक सोन्याचे नेकलेस सापडले.
याबाबत तिवारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो दुकानातून निघून गेला होता. दुसर्या दिवशी केतन जैन यांनी घडलेला प्रकार किशनलाल राठोड यांना सांगितला. या घटनेनंतर त्यांनी ज्वेलर्स शॉपच्या सोन्याच्या दागिन्यांच्या स्टॉकची तपासणी केली होती. या तपासणीत 10 एप्रिल ते 29 एप्रिल 2025 या कालावधीत 371 ग्रॅम वजनाचे 36 लाख 43 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या चोरीमागे आशिष तिवारीचा सहभाग असल्याचे उघडकीस येताच त्यांनी त्याला कॉल केला होता. मात्र त्याने त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही.
या घटनेनंतर किशनलाल राठोड यांनी आशिषविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशिष तिवारीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे सर्व सोन्याचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.