मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – भांडुप येथून पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा २४ तासांत भांडुप पोलिसांनी पर्दाफाश करुन चार महिलांना अटक केली. खुशवू रामआशिष गुप्ता, मैना राजाराम दिलोड, दिव्या कैलास सिंग आणि पायल हेमंत शहा अशी चार महिलांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघींना लोकल कोर्टात गुरुवार २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली असून तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. मुलीचे अपहरण करुन या चौघींनी तिच्या विक्रीची योजना बनविली होती, मात्र त्यांच्या अटकेने त्यांची ही योजना फसली गेली आहे.
यातील तक्रारदार महिला भांडुप येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला साडेपाच वर्षांची एक मुलगी असून ती रविवारी रात्री साडेनऊ वाजता रंगपंचमीनिमित्त फुगे आणण्यासाठी घरातून बाहेर गेली होती. मात्र बराच वेळ होऊन ती परत घरी आली नाही. त्यामुळे तिने तिच्या पती आणि स्थानिक रहिवाशांसोबत तिचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेऊन ती कुठेच सापडली नाही. याच दरम्यान तिला एका व्यक्तीने तिच्या मुलीला त्याच परिसरात राहणार्या खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी आणि अन्य एका अनोळखी महिलेने रिक्षातून नेल्याचे सांगितले होते. या माहितीने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फसणळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेकावडे, गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हवालदार वाघ, पोलीस शिपाई कचरे, कोळी, आटपाटकर, महिला पोलीस शिपाई गवळी, गरुड, रुपाली हाडवळे यांंनी तपास सुरु केला होता. खुशबूच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने मैना दिलोड हिच्या मदतीने या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन त्यांनी तिला रिक्षात बसविले आणि पायल शहा आणि दिव्या सिंग यांच्या स्वाधीन केले होते. या दोघींनीही तिच्या विक्रीची योजना बनविली होती. त्यासाठी त्यांनी तिला स्वतकडे ठेवून घेतले होते. तपासात ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी मैनासह पायल आणि दिव्या या तिघींना अटक केली. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी बळीत मुलीची सुटका करुन तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले. चौकशीत या चौघींनी मुलीच्या विक्रीची योजना बनविली होती. मात्र एका दक्ष नागरिकाने खुशबूसोबत मुलीला पाहिल्यानंतर पोलिसांनी काही तासांत या अपहरणाचा पर्दाफाश करुन चारही आरोपी महिलांना अटक केली.