मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या का अज्ञात वाहनाची धडक लागून झालेल्या अपघातात एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. संजय विठ्ठल महामुनी असे मृत पादचार्याचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळाहून पलायन केल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात रविवारी रात्री साडेअकरा वाजता घाटकोपर येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, स्वराज माथाडी आणि जनरल कामगार व वाहतूक संघटनासमोरील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणार्या वाहिनीवर झाला. किशोर कोंडीराम महामुनी हे घाटकोपरच्या भटवाडीतील रहिवाशी आहे. मृत संजय हा त्यांचा चुलत भाऊ असून तो त्यांच्या घराशेजारी राहत होता. त्याची पत्नी आणि दोन मुली बदलापूरच्या वांगणी येथे राहत असून संजय हा बिगारी कामगार म्हणून कामाला होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजता तो स्वराज माथाडी आणि जनरल कामगार व वाहतूक संघटनासमोरील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणार्या वाहिनीवरुन जात होता.
यावेळी एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी किशोर महामुनी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणा वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.