कमिशनच्या आमिषाला बळी पडून कोकेनची तस्करी महागात पडली
विदेशात आलेल्या महिलेकडून १९.७९ कोटीचे कोकेनचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – कमिशनच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयांची कोकेनची तस्करी करणे एका विदेशी महिलेला चांगलेच महागात पडले. विदेशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या या महिलेकडून महसुल गुप्तवार्ता संचलनालयाच्या अधिकार्यांनी १९ कोटी ७९ लाख रुपयांचे कोकेनचा साठा जप्त केला आहे. तिने बूट आणि शॅम्पूच्या बाटलीतून ते कोकेन आणल्याचे उघडकीस आले आहे. सिएरा लिओन देशाची नागरिक असलेल्या या महिलेविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून सोने, ड्रग्ज आणि विदेशी चलन तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर कस्टम अधिकार्यांसह इतर तपास यंत्रणेने विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या प्रवाशासह त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर जाऊ दिले जात होते. रविवारी एक महिला नैरोबी येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर तिने शूज मॉईश्चरायझर, शॅम्पू बाटलीतून ड्रग्ज आणल्याचे उघडकीस आले. फिल्ट टेस्ट किटचा वापर करुन त्याची चाचणी केल्यानंतर ते कोकेन असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत या अधिकार्यांनी १ किलो ९७९ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन हस्तगत केले असून त्याची किंमत १९ कोटी ७९ लाख रुपये आहे. कोकेन तस्करीच्या मोबदल्यात तिला काही लाख रुपये डॉलर स्वरुपात कमिशन म्हणून मिळणार होते. नैरोबी येथून तिला ते ड्रग्ज मुंबईतील एका व्यक्तीला देण्यासाठी देणत आले होते. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर तिला या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.