अभ्यासामुळे आलेल्या नैराश्यातून सतरा वर्षांच्या मुलीची आत्महत्या
इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑगस्ट 2025
मुंबई, – अभ्यासामुळे आलेल्या नैराश्यातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन कॉलेज मुलीने आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. निवासी इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी घेऊन तिने जीवन संपविले असून यापूर्वीही तिने अशाच प्रकारे आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांत इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या होण्याची ही चौथी घटना असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले. दरम्यान मुलीच्या वडिलांच्या जबानीनंतर आरे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीच्या ए विंग, फ्लॅट क्रमांक 205/2306 मध्ये सतरा वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत राहत होती. ती एका नामांकित कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होते. तिचे वडिल व्यावसायिक असून ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मुगली अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे मानसिक तणावात होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. त्यामुळे तिच्यावर अंधेरीतील धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र या उपचाराचा तिला काहीच फायदा झाला नाही. गुरुवारी दुपारी ती तिच्या बेडरुममध्ये होती. साडेतीन वाजता तिने बेडरुममधून 23 व्या मजल्यावरुन उडी घेतली होती.’
हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरे पोलिसांना ही माहिती दिली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
या घटनेनंतर तिच्या वडिलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात त्यांनी त्यांची मुलगी अभ्यासामुळे मानसिक तणावात होती, तिच्यावर उपचारही सुरु होते. उपचार सुरु असताना तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात तिला यश आले नव्हते. त्यामुळे तिने इमारतीच्या 23 व्या मजल्यावर उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली आहे. या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांकडे सोपविण्यात आला होता. अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.