सहा कोटीच्या रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
चालू वर्षांत सहकार्यांसोबत रॉबरी करुन मुंबईत पळून आला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जुलै 2025
मुंबई, – सहा कोटीच्या रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस आरे पोलिसांनी अटक केली. शिवा रामण्णा शेट्टी असे या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या सहकार्यांच्या मदतीने चालू वर्षांत नांदेड आणि लातूर येथे सहा कोटीची रॉबरी केली होती. या दोन्ही रॉबरीनंतर तो मुंबईत पळून आला होता, अखेर त्याला गोरेगाव येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला नांदेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
शिवा शेट्टी हा गोरेगाव येथील दिडोंशी, गोकुळधामच्या अंकुर अपार्टमेंटमध्ये राहतो. तो रॉबरीच्या गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार आहे. चालू वर्षांत त्याने त्याच्या सहकार्यांसोबत नांदेड आणि लातूर येथे दोन कॅश रॉबरी केली होती. या दोन्ही गुन्ह्यांत सुमारे सहा कोटीची कॅश लुटण्यात आली होती. याप्रकरणी नांदेड आणि लातूरच्या किनगाव पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच त्याच्या सहकार्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत शिवा शेट्टी याचे नाव समोर आले होते.
मात्र रॉबरीनंतर तो पळून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तो गोरेगाव परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या वास्तव्याची माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक आनंद बचेवर व अन्य पोलीस पथक मुंबईत आले होते. या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांची भेट घेऊन शिवा शेट्टी याच्या अटकेसाठी मदत मागितली होती. त्यानंतर या पथकासह आरे पोलिसांनी गोरेगाव परिसरात साध्या वेशात पळून आलेल्या शिवा शेट्टीला शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने त्याचा दोन्ही कॅश लुटमारीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला नांडेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नांदेड येथे नेण्यात आले होते. त्यानंतर त्याचा ताबा लातूर पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.