हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाची लुटणार्या टोळीचा पर्दाफाश
मुख्य आरोपी महिलेसह चौघांना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – हनी ट्रॅपद्वारे एका व्यावसायिकाला रिक्षातून पवईहून गोरेगाव येथील आरे कॉलनीत आणून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटमार करणार्या एका टोळीचा आरे पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका आरोपी महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल सिद्धार्थ वाघ, नमेश नागेश सुर्वे, जहॉगीर सल्लाउद्दीन कुरेशी आणि शहरीन औरंगजेब कुरेशी ऊर्फ सायरा अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीची सायरा ही प्रमुख आरोपी असून तिने इतर तिघांच्या मदतीने ही लुटमार केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले. या चौघांकडून पोलिसांनी पाच लाखांची सोनसाखळीसह गुन्ह्यांतील बाईक आणि रिक्षा असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
मोहम्मद हनीफ साबुला खान हे 45 वर्षांचे व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत गोवंडीतील देवनार कॉलनीत राहतात. सायरा ही त्यांची परिचित असून त्यांची चांगली मैत्री होती. 23 नोव्हेंबरला तिने त्यांना पवई येथे बोलाविले होते. त्यामुळे ते तिला भेटण्यासाठी पवई येथे गेले होते. काही वेळानंतर ते दोघेही एका रिक्षातून निघाले. साडेसात वाजता ही रिक्षा गोरेगाव येथील आरे कॉलनीतील एका निर्जनस्थळी आली होती. काही वेळानंतर तिथे दोन तरुण आले होते. यावेळी या दोघांनी रिक्षाचालकाच्या मदतीने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्या गळ्यातील पाच लाखांची सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते.
या घटनेनंतर त्यांनी स्वतला सावरत नंतर आरे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना तपासाचे आदेश दिल होते.
या आदेशांनतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, गणेश पाटील, पोलीस नाईक महाले, पोलीस शिपाई बरकडे यांनी तपास सुरु केला होता. पवई-गोरेगाव आरे कॉलनीतील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली होती.
या घटनेनंतर मोहम्मद हनीफ यांची मैत्रिण घटनास्थळाहून पळून गेली होती. त्यामुळे सायरा ऊर्फ शहरीन कुरेशी हिला मानखुर्द येथील राहत्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून या संपूर्ण लुटमारीच्या घटनेचा उलघडा करण्यात पोलिसांना पर्दाफाश केला. त्यानंतर तिच्या जबानीतून आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी विशाल वाघ, नमेश सुर्वे आणि जहॉगीर कुरेशी या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.
या आरोपींकडून पोलिसांनी चोरीची पाच लाख रुपयांची सोन्याची चैन, गुन्ह्यांत वापरलेली एक लाखांची पल्सर बाईक आणि साडेचार लाखांची रिक्षा असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात तासात कुठलाही पुरावा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने या रॉबरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आणि चारही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक केली. त्यामुळे या पोलीस अधिकार्यांसह कर्मचार्यांचे वरिष्ठाकडून कौतुक करण्यात आले.