वयोवृद्ध आजारी रस्त्यावर पळून जाणार्या नातवासह तिघांना अटक
सीसीटिव्ही फुटेजवरुन नातवानेच आजीला सोडल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – आरे कॉलनीत बेवारस सापडलेल्या यशोदा गायकवाड या 70 वर्षांच्या वयोवृद्ध आजारी आजीला तिच्याच नातवाने रस्त्यावर टाकून पलायन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याकामी त्याला त्याच्याच मेहुण्यासह एका रिक्षाचालकाने मदत केली होती. कांदिवली-गोरेगावदरम्यान सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोपी नातवासह तिघांविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली. सागर शेवाळे, बाळासाहेब गायकवाड आणि संजय कुशदीम ऊर्फ बॉबी अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर तिघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
सत्तर वर्षांची यशोदा गायकवाड ही महिला कांदिवलीतील पोईसर परिसरात तिचा नातू सागर शेवाळे याच्यासोबत राहते. सागर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर त्याची पत्नी घरकाम करते. या दोघांनाही एक अकरा वर्षांचा मुलगा आहे. आई-वडिल कामावर गेल्यावर हा मुलगा आजीसोबत घरी राहत होता. शनिवारी ते दोघेही सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. यावेळी त्याची आजी यशोदा आणि त्यांचा मुलगा एकटेच घरातच होते. कामावर गेल्यानंतर अध्या तासानंतर आजी घरातून निघून गेली आणि रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. याच दरम्यान ती आरेजवळ एका कचर्याजवळ बेशुद्धावस्थेत पडल्याचे काही लोकांना निदर्शनास आले. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने तिथे धाव घेतली होती. तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला कूपर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिला तिच्या नातवानेच आरेजवळ टाकून पलायन केले असे वृत्त सर्वत्र पसरताच त्याची आरे पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या नातवाचा शोध घेतला. अखेर सागर शेवाळेला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याला त्याची आजी कधी घराबाहेर गेली, ती आरेजवळ कशी आली याबाबत काहीच माहित नव्हते. पोलिसांचा कॉल आल्यानंतर त्याला त्याची आजी सापडल्याचे तसेच तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले. त्याची आजी गेल्या काही वर्षांपासून त्याच्यासोबत राहते. तिचे एक दुकान असून ते दुकान तिने भाड्याने दिले होते. त्याचा तिला दहा हजार भाडे मिळत आहे.
तिला मधुमेहाचा आजार असून तिच्या नाकावर मोठी जखम आहे. तिने चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केल्याने ती जखम आणखीन चिघडली होती. त्यातून तिला गॅगरीन झाले. त्यात तिची प्रकृती बिघडली होती. शुक्रवारी तिची प्रकृती खूप बिघडली होती. तिला सतत तिला कोणीतरी बाहेर काढत असल्याचे वाटत होते. त्यातून ती घरातून निघून गेल्याचे त्याने आपल्या जबानीत म्हटले होते. त्याने त्याच्या आजीला सोडले नाही, कारण त्यावेळेस तो त्याच्या कामावर होता. या जबानीनंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. कांदिवली-गोरेगावपर्यंतचे काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात सागरनेच त्याच्या आजीला तिथे टाकून पलायन केल्याचे उघडकीस आले. याकामी त्याला त्याचा मेहुणा बाळासाहेब आणि रिक्षाचालक संजय याने मदत केली होती.
शुक्रवारी सागर हा त्याच्या आजीला घेऊन शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेला होता, मात्र तिथे यशोदा यांना दाखल करण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे त्याने या दोघांच्या मदतीने तिला आरेजवळील रस्त्यावर टाकून पलायन केले होते. त्यासाठी सागरने रिक्षाचालक संजयला चारशे रुपये दिले होते. एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार दिसून आला. त्यानंतर या तिघांविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. यशोदा यांच्याावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्यावर लवकरच नागपूरच्या एसीआई वैद्यकीय केंद्रात मोफत उपचार होणार आहे. त्याची सर्व जबाबदारी संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने घेतली आहे.