मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जून 2025
मुंबई, – गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. आई-वडिलांचा राग आल्याने तिने रुममध्ये गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांची आरे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरले नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
14 वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनी, आदिवासी वस्ती राहते. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती. ती सतत मोबाईलवर गेम खेळत होती. याच कारणावरुन तिचे तिच्या आई-वडिलांशी सतत वाद होत होता. तिला अभ्यासासह आईला कामात मदत करण्याबाबत प्रवृत्त केले जात होते. तरीही तिचे मोबाईलच्या गेमवरील प्रेम काही कमी झाले नाही. सोमवारी तिच्या आई-वडिलांनी तिला गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही. त्याचा तिला प्रचंड राग होता.
याच रागाच्या भरात तिने आतून कडी लावून घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार तिच्या आई-वडिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलीला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर तिच्या आई-वडिलांची पोलिसांनी जबानी नोेंदवून घेतली होती.
या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. तिच्या आत्महत्येला त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्या जबानीनंतर आरे पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. मोबाईलवर गेम खेळण्यास दिला नाही म्हणून मुलीच्या आत्महत्येने तिच्या आई-वडिलांसह स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.