मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येतील मुख्य साक्षीदार लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्हॉटअप ग्रुपवरुन ही धमकी मिळताच लालचंद पाल यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करुन धमकी देणार्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
गेल्या वर्षी अभिषेक घोसाळकर यांची त्यांच्याच परिचित मित्र मॉरीस नोरोन्हा ऊर्फ मॉरोस भाई याने फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मॉरोस भाई याने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या संपूर्ण हत्याकांडात लालचंद पाल हा मुख्य साक्षीदार आहे. दहिसरच्या कांदरपाडा परिसरात लालचंद हा राहत असून त्याचे तिथेच किराणा मालाचे एक दुकान आहे. तो ठाकरे यांच्या शिवसेना निष्ठावंत शिवसैनिक असून त्याच्यावर सध्या शिवसेना शाखा क्रमांक एकच्या कार्यालय प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 1 एप्रिलला ते त्याच्या घरात होते. यावेळी त्यांना गरीब नवाज कमिटी नावाच्या एका व्हॉटअप ग्रुपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
या ग्रुपमध्ये त्यांना उद्देशून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह मॅसेज टाकण्यात आला होता. नंतर हा मॅसेज गु्रपमधून काढून टाकण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी मॅसेजचा स्क्रिनशॉट काढला होता. ही माहिती नंतर लालचंदने घोसाळकर कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांत जिवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार केली होती. या ग्रुपचा अॅडमिन आबिद शेख असून त्याला या मॅसेजची कल्पना होती का याचा पोलीस तपास करत आहे. या धमकीमुळे पाल व त्यांचे कुटुंबिय प्रचंड मानसिक तणावात आहेत. त्यामुळे धमकी देणार्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.