भूमिका

शहरातील एका नामांकित ग्रुपच्या हॉटेलमध्ये कॅशिअर म्हणून काम केल्यानंतर ही नोकरी वैयक्तिक कारणामुळे सोडावी लागली. याच दरम्यान दुसर्‍या नोकरीच्या शोधात होतो. मात्र बरेच प्रयत्न करुनही काम मिळाले नाही. त्यामुळे पोलीस खात्यात असलेले माझे दिवंगत भावोजी- पोलीस हवालदार आल्हाद गायकवाड यांनी क्राईम रिपोर्टरची नोकरीची ऑफर दिली. 

त्यांचा एक मित्र आणि सांज समाचारचे संपादक रफिक कामदार यांच्याकडे मला पाठविले. तिथे नऊ महिने खडतर पत्रकारितेचा प्रशिक्षण घेतल्यानंतर क्राईम रिपोटींगसाठी सुरुवात केली होती. पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस अधिकार्‍यांशी ओळख वाढवून त्यांच्याकडून बातमी मिळविणे फारच कठीण काम होते, मात्र पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच वार्ताहर कक्षात येणार्‍या प्रत्येक पत्रकार मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. 

नवखा असल्याने अनेकांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे कामात उत्साह निर्माण होत गेला. अखेर भावोजी आल्हाद गायकवाड यांचा मित्र आणि क्राईम रिपोटींगचा प्रचंड अनुभव असलेले राजेंद्र वेदांते यांच्याशी माझी ओळख झाली होती. त्यांनी मला मुंबई तरुण भारतसाठी क्राईम रिपोटींग करण्याची संधी दिली. 

सांज तरुण भारतसाठी राजेंद्र वेदांते काम करत होते आणि त्यांनी मुंबई तरुण भारतसाठी माझी शिफारस केली होती. मुंबई तरुण भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वर्तमानपत्र होते, त्यामुळे वर्तमानपत्रात क्राईमशी संबंधित वृत्त फारसे प्रसिद्ध होत नव्हते. मूळात त्यांच्या वाचकांना क्राईम वृत्तच आवडत नव्हते. त्यामुळे तिथे क्राईम रिपोर्टर ठेवण्याचा प्रश्‍नच आलाच नाही. तरीही माझी मुंबई तरुण भारतमध्ये पहिला अधिकृत क्राईम रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली. 

आमचे संपादक दिलीप करंबळेकर यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून कामाला सुरुवात कर असा सल्ला दिला. पाचशे रुपये मानधन आणि अडीचशे रुपये प्रवास भत्ता असा माझे वेतन ठरले होते. मी प्रचंड खुश होता. नव्या जोमाने, उत्साहाने कामाला आहे. कधी नव्हे तर मुंबई तरुण भारतमध्ये क्राईम वृत्त प्रसिद्ध होऊ लागले. त्याला काही वाचकांचा विरोध होता, मात्र या विरोधानंतरही संपादक दिलीप करंबळेकर यांनी माझी बाजूने घेत माझ्या बातम्यांना ठळकपणे प्रसिद्ध दिली. 

जवळपास सात ते आठ वर्ष मुंबई तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर वृत्तमानसचे संपादक घनश्याम गोसावी यांनी वृत्तमानससाठी मला बोलाविले. गेल्या २८ वर्षांत वृत्तमानस, नवाकाळ, प्रहार, जनशक्ती, प्रभात, नवशक्ती, आपल महानगर, पुण्यनगरी, मुक्तपीठ आदी दैनिकासह वेब पोर्टलसाठी काम केले. 

या कालावधीत अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले, त्याचा रिपोटींगसाठी चांगला फायदा झाला. चांगले-वाईट अनुभव आले, मात्र चांगली गोष्ट घेऊन वाईट अनुभवातून शिकत पुढे गेलो. या कालावधीत क्राईम रिपोटींग करताना स्वतचे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. माझा हिंतचितक आणि मित्र आबा माळकर यांनी स्वतचा क्राईम वेब पोर्टल सुरु करण्याचा सल्ला दिला. 

सुरुवातीला ही जबाबदारी आपल्याला झेपणार नाही असे वाटत होते, मात्र आबा माळकरला माझ्या कामाविषयी जास्तच आत्मविश्‍वास होता, त्यामुळे त्याने माझा पिछा सोडला नाही. अखेर आबासोबत दोन ते तीन मिटींग घेऊन वेब पोर्टलची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण काही तरी नवीन सुरु करायचा तर क्राईमचे सर्वाधिक बातम्या देणारे वेब पोर्टल सुरु करायला काय हरकत आहे असा विचार केला. त्यात आबासह माझा सहकारी वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांची साथ होतीच. 

अखेर वेब पोर्टल सुरु करण्याचा मुहूर्त ठरला. मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नाव सुचले आणि याच नावाने वेब पोर्टल करण्याचा निर्णय घेतला. कुठलही चांगल्या कामाची सुरुवात गणरायाच्या नावाने होते, माझ्या आयुष्यात गणपती बाप्पाचे विशेष स्थान आहे. त्यामुळे वेब पोर्टलची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजेच माघी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरु करण्याचा निर्णय पक्का झाला. 

आज आपल्या सेवेत माझे क्राईमचे वेब पोर्टल सुरु करताना नक्कीच आनंद होत आहे. माझ्यावर प्रेम करणार्‍या, सतत माझ्या पाठिशी उभे राहणार्‍या माझ्या मित्रांनी, पोलीस अधिकारी, सहकारी आणि इतर ज्ञात-अज्ञात हिंतचितकांनी अशा प्रकारे मला साथ द्यावी. तुमच्या आर्शिवार्द, सहकार्याच्या जोरावर मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नक्कीच यशाचे शिखर गाठेल अशी आशा बाळगतो.

मुख्य संपादक
अरुण बाबाजी सावरटकर 

You cannot copy content of this page