चुन्नाभट्टी गोळीबाराच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

आरोपीविरुद्ध गोळीबारासाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – डिसेंबर २०२३ रोजी चुन्नाभट्टी येथे सुमीत ऊर्फ पप्पू येरुणकर या सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस तीन वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी नवी मुंबईतून अटक केली. सुमीत स्वस्तिक सावंत असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्यावर गोळीबारासाठी मुख्य आरोपींना घातक शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. अटकेच्या भीतीने तो गेल्या तीन वर्षांपासून गोवा, चेन्नई, राजस्थान, दिल्ली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत स्वताचे अस्तित्व बदलून राहत असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांतील आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर सुमीतला मोक्का कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा गोळीबार २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वातीन वाजता चुन्नाभट्टी येथील व्ही.एन पुरव मार्गावरील आझाद गल्लीत झाला होता. सुमीत येरुणकर हा स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २४ डिसेंबरला सुमीत हा त्याच्या मित्रांसोबत आझाद गल्लीतून जात होता. याच दरम्यान तिथे बाईकवरुन दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी सुमीतच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात सुमीतसह इतर चारजण जखमी झाले होते. अचानक झालेल्या गोळीबाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमी झालेल्या पाचजणांना जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे सुमीतला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर चौघांवर उपचार सुरु करण्यात आले होते. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपीसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तपास पूर्ण होताच त्यांच्याविरुद्ध मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात सुमीत सावंत याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते.

सुमीतने गोळीबारासाठी मुख्य आरोपींना घातक शस्त्रे पुरविले होते. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना सुमीत हा नवी मुंबईतील खारघर परिसरात स्वतचे अस्तित्व बदलून राहत असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, श्रीकांत काळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, संदीप रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना माशेरे, सुहास देसाई, पोलीस हवालदार गायकवाड, खेडकर, महिला पोलीस शिपाई उर्मिला शेवाळे या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

तांत्रिक माहितीसह मानवी कौशल्याच्या वापर करुन सोमवारी रात्री उशिरा सुमीतला खार येथील गितांजली ज्वेलर्सजवळील सेक्टर १९ समोरुन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो मोक्काच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. सुमीत हा खाजगी नोकरी करत असून सध्या चुन्नाभट्टी येथील रिलायन्स फ्रेशसमोरील स्वदेवी मिल चाळीत राहतो. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी चुन्नाभट्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page