दोन लाखांच्या लाचप्रकरणी मनपाचा वार्ड निरीक्षक दोषी
चार वर्षांच्या कारावासासह 55 हजाराच्या दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – दोन लाख रुपयांची लाचप्रकरणी कारवाई झालेले लोअर परेल येथील जी/साऊथ मनपाचे वॉर्ड अधिकारी प्रविण केशव सिंग यांना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासासह 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने ही शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्ह्यांतील तक्रारदार एका जाहिरात एजन्सी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचे टॅक्स असेसमेंटचे एक काम प्रलंबित होते. त्यासंदर्भात नो ड्यू सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्याकडे प्रविण सिंग यांनी चार लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. प्रविण हे लोअर परेल येथील धनमिलनाका, महानगरपालिकेच्या जी/साऊथ विभागात वॉर्ड अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कामासाठी त्यांनी तक्रारदारांकडे दोन लाख रुपये घेतले होते. उर्वरित रक्कम देण्यासाठी ते त्यांना वारंवार विचारणा करीत होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर 28 जुलै 2017 रोजी या अधिकार्यांनी प्रविण सिंग यांच्या कार्यालयाबाहेर सापळा लावून दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी विशेष सेशन कोर्टात सुरु होती. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने प्रविण सिंग यांना सबळ पुराव्या आधारे दोषी ठरविले होते.
बुधवारी 30 एप्रिलला कोर्टाने त्यांना चार वर्षांच्या कारावासासह 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास निवृत्त पोलीस निरीक्षक सीमा अडनाईक यांनी केला होता तर सरकारी वकिल म्हणून रमेश सिरोया यांनी कामकाज पाहिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.