आरोग्य विभागाच्या परवान्यासाठी सहा हजाराची लाचेची मागणी
मनपाच्या बी वॉर्डच्या वैद्यकीय अधिकार्यासह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंंबई, – आरोग्य विभागाच्या परवान्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाकडे सहा हजाराची लाचेची मागणी करुन लाचेची ही रक्कम घेताना मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्यासह दोघांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. रेश्मा हिरामन साबळे आणि श्रमिक गोविंद गणपत घावट अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी विशेष सेशन कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ते दोघेही जे. जे हॉस्पिटलसमोरील रामचंद्र भट्ट मार्ग, मनपाच्या बी वॉर्डचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलचा आरोग्य विभागाचा परवाना 21 फेब्रुवारी 2025 रोजी संपला होता. त्यामुळे त्यांनी हॉटेलचा आरोग्य विभागाचा परवाना वाषिक नूतनीकरणासाठी महानगरपालिकेच्या बी वॉर्ड विभागात अर्ज केला होता. त्यासाठी ते संबंधित कार्यालयात गेले होते. त्यांनी डॉ. रेश्मा साबळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तेथील श्रमिक गोविंद घावट यांनी त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे सहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. सहा हजार रुपये दिल्यानंतर त्यांच्या हॉटेलचा परवाना एनटीआर मधून काढून त्यांना नूतनीकरण करता येईल. नूतनीकरणाचे पैसे ऑनलाईन भरल्यानंतर त्यांना आरोग्य विभागाचा परवाना मिळेल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी डॉ. रेश्मा साबळे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाचा परवाना देण्यासाठी सहा हजाराची लाचेची मागणी केली.
ही लाच दिल्याशिवाय त्यांना परवाना मिळणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी रेश्मा साबळे यांना तुम्ही आधी एनटीआर काढा, परवाना नूतनीकरणासाठी सहा हजार रुपये नंतर देतो असे सांगितले. मात्र तिने त्यांचे काम केले नाही. त्यांच्या लॉगिन आडीवरुन लॉगिन केल्याशिवाय त्यांना आरोग्य परवाना नूतनीकरण करुन मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची इच्छा नसताना त्यांना सहा हजार रुपये देण्याचे मान्य केले. 21 मार्चला त्यांनी डॉ. रेश्मा साबळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्याकडून शहानिशा करण्यात आली होती.
यावेळी रेश्मा साबळे यांनी लाचेची ही रक्कम घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे सोमवारी या अधिकार्यांनी तिथे सापळा लावला होता. यावेळी रेश्मा साबळे यांच्या वतीने सहा हजाराची लाच घेताना श्रमिक गोविंद घावट याला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. याच गुन्ह्यांत नंतर रेश्मा साबळे यांनाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त निरज उबाळे, पर्यवेक्षक अधिकारी व पोलीस निरीक्षक नारायण सरोदे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.