नोंदणी केलेल्या दस्तावेजाची प्रत देण्यासाठी लाचेची मागणी
सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – नोंदणी केलेल्या दस्तावेज कागदपत्रांची स्कॅनिंग करुन तसेच मूळ प्रत देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुलुंड येथील नाहूर सह दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक संजय मुंजाजीराव घोडजकर, वरिष्ठ लिपीक दिपा अर्जुन गुजरे आणि खाजगी व्यक्ती सिद्धेश विकास मोरे या तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर संजय घोडजकर यांनी सिद्धेश मोरेच्या मदतीने या रक्कमेची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचा तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या तिघांची लवकरच या अधिकार्यांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. सह दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन अधिकार्यांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार एका खाजगी सल्लागार संस्थेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. ही संस्था विविध दस्तावेज नोंदणी, अभिहस्तांतरण, अधिकार अभिलेखात नाव दाखल करणे आणि इतर प्रकारच्या दस्तावेज नोंदणीचे काम करते. त्यांच्याकडे अशा प्रकारचे अनेक दस्तावेज नोंदणीसाठी येत होते. १५ फेब्रुवारला त्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या काही दस्तावेजाची नाहूर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली होती. या दस्तावेजाच्या कागदपत्रांची स्कॅनिंग करुन देण्यासाठी तसेच मूळ दस्तावेज प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. २५ हजार रुपये संजय घोडजकर यांना तर पाच हजार दिपा गुजरे यांना दिल्यानंतर त्यांना दस्तावेजाच्या प्रती मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध २० फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित अधिकार्यांकडून त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात त्यांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात सापळा लावला होता.
यावेळी संजय घोडजकर यांनी त्यांच्या हिस्साची लाचेची २४ हजाराची रक्कम घेतली होती. यावेळी पोलिसांनी तिथे छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याकडे लाचेची रक्कम सापडली नाही. त्यांनी खाजगी व्यक्ती सिद्धेश मोरे याच्या मदतीने पुरावा असलेल्या नोटांची विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले. नोंदणी केलेल्या दस्तावेजाची प्रत देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी संजय घोडजकर, दिपा गुजरे आणि सिद्धेश मोरे या तिघांविरुद्ध पोलिसांनी लाचप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे या तिघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.