पोलीस हवालदाराकडून लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
पोस्टींगसह गैरहजर राहण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – पोलीस हवालदाराकडून अठराशे रुपयांची लाच घेताना त्यांचाच सहकारी पोलीस शिपाई सुयश शरद कांबळे याला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. कुर्ला कोर्टातील पोस्टींग कायम ठेवण्यासाठी तसेच कर्तव्यावर गैरहजर राहण्यासाठी सुयशने तक्रारदार हवालदाराकडे महिना आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी सहा दिवसांचा अठराशे रुपयांचा पहिला हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार आणि सुयश हे दोघेही मरोळ पोलीस दलातील ल विभाग चारमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार पोलीस हवालदार असून ते ल विभाग चारमध्ये कार्यरत आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग एच कंपनीत असून त्यांना कुर्ला कोर्टात बंदोबस्ताकामी ठेवण्यात आले होते. १ मेला त्यांचा सहकारी पोलीस शिपाई सुयश कांबळे याने त्यांना फोन करुन तुमची इतरत्र बदली करतो असे सांगितले होते. यावेळी त्यांनी त्यांना कुर्ला कोर्टात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगून त्यांना तिथेच कर्तव्य देण्याची विनंती केली होती. त्यावरुन त्यांनी त्याला कर्तव्यावर गैरहजर राहण्याचीही विनंती केली होती. त्यासाठी सुयशने त्यांच्याकडे महिना आठ ते दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची तयारी दर्शवून ९ मेला त्यांनी सुयश कांबळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची रविवारी १२ मेला संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तक्रारदारांच्या पोस्टिंगसह कर्तव्यावर गैरहजर राहण्यासाठी सुयश कांबळे याने त्यांच्याकडे प्रतिदिन चारशेऐवजी तीनशे रुपये घेण्याचे मान्य केले होते. गुरुवारी सहा दिवसांचे अठराशे रुपये घेऊन कार्यालयात येऊन भेटा असेही त्याने सांगितले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी या अधिकार्यांनी तिथे सापळा लावून सुयश कांबळे याला सहा दिवसांचा लाचेचा पहिला हप्ता म्हणून अठराशे रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत सुयशसोबत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत, त्यांनाही लाच म्हणून पैसे दिले जाणार होते का, सुयशने अशा प्रकारे किती पोलीस कर्मचार्यांकडे लाचेची मागणी करुन त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.