आठ लाखांच्या लाचप्रकरणी मनपाच्या दोन अभियंतासह तिघांना अटक
अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
मुंबई, – इमारतीच्या पाचव्या मजल्यावर केलेल्या अधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची लाचेची मागणी करुन आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना महानगरपालिकेच्या दोन अभियंतासह खाजगी व्यक्ती अशा तिघांना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगेश चंद्रकांत कांबळी, सुरज शिवाजीराव पवार आणि निलेश जयंती होडार अशी या तिघांची नावे आहेत. यातील मंगेश कांबळी आणि सुरज पवार हे मरिनलाईन्स येथील चंदनवाडी, सी वॉर्ड, मनपाच्या इमारत व कारखाने विभागात अनुक्रमे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता असून निलेश होडार हा खाजगी व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले.
यातील तक्रारदार दक्षिण मुंबईतील रहिवाशी असून व्यावसायिक आहेत. त्यांनी पार्टनरशीपमध्ये बांधकाम केलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील पोटमाळ्यावर अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामाची सी वॉर्डच्या इमारत आणि कारखाने विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली असता ते बांधकाम अनधिकृत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांना संबंधित बांधकाम निष्काशनाची कारवाईची मनपाकडून देण्यात आली होती. या नोटीसनंतर त्यांनी कनिष्ठ अभियंता मंगेश कांबळी आणि दुय्यम अभियंता सुरज पवार यांची भेट घेऊन अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. यावेळी या दोघांनीही अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर ते बांधकाम तोडण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची त्याची संबंधित विभागाकडून शहानिशा करण्याात आली होती. यावेळी मंगेश कांबळी आणि सुरज पवार यांनी टेरेसवरील शेडचे पंधरा लाख आणि पाचव्या मजल्यावरील अनधिकृत कामाचे पाच लाख रुपये असे वीस लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. शुक्रवारी दुपारी या लाचेचा पहिला आठ लाखांचा हप्ता देण्याचे ठरले होते. त्यामुळे तक्रारदार आठ लाख रुपये घेऊन सी वॉर्डजवळ आले होते. यावेळी लाचेची ही रक्कम मंगेश कांबळी आणि सुरज पवार यांच्या वतीने खाजगी व्यक्ती निलेश होडार यांनी घेतली होती. त्याला लाचेची ही रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर या अधिकार्यांनी मंगेश कांबळी आणि सुरज पवार यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. लाचेच्या गुन्ह्यांत दोन अभियंत्यांवर कारवाई झाल्याचे वृत्त समजताच सी वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.