मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – भावासोबत कॉलेजला जाताना डंपरची धडक लागून एका २१ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ जखमी झाला. मृत तरुणीचे नाव प्राची निरज शर्मा असून तिच्या भावाचे नाव क्षितीज निरज शर्मा असल्याचे पोलिसंनी सांगितले. याप्रकरणी हलगर्जीपणा डंपर चालवून डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाताना कुठलेही सिग्नल न देता अपघात घडवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपरचालक सरजू सामू राजभर (४५) याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. प्राचीच्या अपघाती निधनाने तिच्या मिरारोड येथील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
क्षितीज हा १९ वर्षांचा तरुण त्याचे वडिल निरज, आई मिनू आणि बहिण प्राचीसोबत मिरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीजवळील युफोरिया इमारतीमध्ये राहतो. त्याचे वडिल निरज हे कल्पतरु प्रोजेक्ट इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. क्षितीज आणि प्राची हे दोघेही बोरिवलीतील सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये दुसर्या आणि तिसर्या वर्गात शिकतात. सकाळी साडेआठ वाजता ते एकत्र कॉलेजसाठी त्यांच्या बाईकवरुन जातात आणि सायंकाळी चार वाजता घरी येतात. गुरुवारी १५ फेब्रुवारीला ते दोघेही नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी क्षितीज हा बाईक चालवत होता तर प्राची त्याच्या मागे बसली होती. ही बाईक दहिसर चेकनाका येथे येताच एका डंपरचालकाने अचानक उजव्या बाजूला डंपर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने कोणताही सिग्नल दिला नव्हता. त्यामुळे डंपरला धडक लागू नये म्हणून त्याने बाईकला ब्रेक लावला होता. यावेळी त्यांची बाईक स्लिप होऊन ते दोघेही खाली पडले. याच दरम्यान डंपरच्या चाकाखाली आल्याने प्राची ही गंभीररीत्या जखमी झाली होती.
जखमी अवस्थेत तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी क्षितीज शर्मा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक सरजू राजभर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. अपघातानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सरजू हा दहिसर येथील केतकीपाडा, लोथी कंपाऊंडचा रहिवाशी असल्याचे पोलिसंनी सांगितले.