शहरात दोन अपघातात पोलीस शिपायासह दोघांचा मृत्यू

परळ व ताडदेव येथील अपघात; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, –  शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका पोलीस शिपायासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये धनराज भगवान घाग आणि दिपक कल्लू निर्मल यांचा समावेश असून यातील धनराज हा ल विभागातील पोलीस शिपाई आहे. याप्रकरणी ताडदेव आणि भोईवाडा पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

पहिला अपघात बुधवारी रात्री उशिरा अडीच वाजता परळ येथील एलफिस्टन ब्रिजवर झाला. २५ वर्षांचा धनराज घाग हा पोलीस शिपाई असून तो सध्या ल विभागात कार्यरत आहे. भोईवाडा येथील जी. डी आंबेकर मार्ग, आंबेवाडी, मंगलाप्रसाद चाळीत तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. कल्पेश गोविंदकुपू अलामालू हा त्याचा मित्र असून ते दोघेही बुधवारी रात्री त्यांच्या केटीएम बाईकवरुन घरी जात होते. ही बाईक परळ येथील एलफिस्टन ब्रिजवरुन जात असताना अचानक एका भरवेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात कल्पेश आणि धनराज हे दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना धनराज घाग याचा मृत्यू झाला तर कल्पेशवर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गोविंदकुपू यांच्या तक्रारीवरुन भोईवाडा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत. धनराजचा मृतदेह त्याचा चुलत भाऊ किरण दिगंबर घाग याच्याकडे सोपविण्यात आला आहे. किरण हादेखील पोलीस खात्यात कार्यरत असून सध्या तो एमआरए मार्ग पोलीस ठण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. धनराज घाग याच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.

दुसरा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ताडदेव येथील आरटीओ गल्ली, बॉडीगार्ड लेनजवळ झाला. कल्लू सिंधू निर्मल हा मूळचा उत्तरप्रदेशच्या रायबरेलीचा रहिवाशी असून ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात राहतो. मृत दिपक हा त्याचा मुलगा असून तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. सोमवारी ८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता तो त्यांच्या बहिणीकडे गेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तो बॉडीगार्ड लेनवरुन घराच्या दिशेने येत होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोने त्याला धडक दिली होती. या अपघातात दिपक हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना दुपारी एक वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्लू निर्मल यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपी टेम्पोचालक भैरव मिश्रा याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका पादचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा ताडदेव पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page