मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ एप्रिल २०२४
मुंबई, – तीन विविध अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. तिन्ही अपघात बोरिवली, कांदिवली आणि माहीम परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एमएचबी, समतानगर आणि माहीम पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
पहिला अपघात बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक नऊजवळ झाला. प्रिती संतोष ही मालाड येथे तिच्या दोन मुलीसोबत राहत असून मालाडच्या एका पॉलिशिपिंग वर्कशॉपमध्ये कामाला आहे. तिचे पती संतोष बसवराज सलगर हे गणपत पाटील नगरात राहत असून त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. गेल्या दोन वर्षांपासून ते वेगळे राहत आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता संतोषला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी प्रितीची एमएचबी पोलिसांनी जबानी नोंदवून अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसर्या अपघातात साईल जिलानी शेख या २० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. साईल हा कांदिवली येथे राहत असून २९ मार्चला त्याच्या केटीएम बाईकवरुन लोखंडवाला सर्कल, गोदरेज हाईटसमोरुन जात होता. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. बाईक स्लिप झाल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला शताब्दी रुगणालयात दाखल करण्यात आले होते, त्याची प्रकृती प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर कूपर रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथेच उपचार सुरु असताना सोमवार १५ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी साईलविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तिसरा अपघात माहीम येथे झाला. रविवारी १४ एप्रिलला रात्री सव्वाअकरा वाजता माहीम येथील तुळशीपाईप रोड, सरस्वती मंदिर हायस्कूलसमोर रस्त्यावर एक अपघात झाल्याची माहिती माहीम पोलिसांना मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना बाईक अपघात झाल्याचे दिसून आले. जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे निलेश ईश्वर पाटील आणि भावेश अशोक धोरणे या दोघांना मृत घोषित करण्यात आले तर विकास नंदराज सोनावणे याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. तपासात निलेश हा बाईकवरुन ट्रिपल सीट विना हेल्मेट जात होता. भरवेगात बाईक चालविताना त्याने एका बसला धडक दिली आणि हा अपघात झाला. याप्रकरणी निलेशविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.