मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दोन वेगवेगळ्या अपघातात एका ७९ वर्षांच्या वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात कांदिवली आणि काळाचौकी परिसरात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका चालकास अटक केली तर दुसरा चालक अपघातानंतर पळून गेल्याने त्याचा शोध सुरु केला आहे.
पहिला अपघात सोमवारी सकाळी पाच वाजता काळाचौकी येथील लालबाग, माझ घर हॉटेलसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवर झाला. विठ्ठल कृष्णा कदम हे ६६ वर्षांचे वयोवृद्ध काळाचौकी परिसरात राहतात. याच परिसरात मृत पांडुरंग दगडू मातारे (७९) हे राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघेही शहीद भगतसिंग मैदानात पहाटे साडेचार वाजता मॉर्निंग वॉकसाठी जातात. सोमवारी पहाटे ते दोघेही मॉर्निंग वॉकसाठी आले होते. वॉकनंतर ते डॉ. दत्ताराम लाड मार्गावरुन घराच्या दिशेने जात होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन परळच्या दिशेने जाणार्या एका कारने पांडुरंग मातारे यांना जोरात धडक दिली. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सकाळी सव्वादहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विठ्ठल कदम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोष काशिनाथ शेडकर या कारचालकाविरुद्घ गुन्हा नोंदविला होता.
दुसर्या अघातात विजयकुमार गौतम या ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी १९ फेब्रुवारीला त्याला एका महिलेसह चारजण शताब्दी रुग्णालयात घेऊन आले होते. त्याच्यावर तिथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे सापडलेल्या आधारकार्डवरुन त्याचे नाव विजयकुमार गौतम असल्याचे उघडकीस आले. त्याच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र त्याचे नातेवाईक सापडले नाही. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर वाहनचालकाने त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तेथून पलायन केले होते. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.