दोन अपघातात सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू

दहिसर-चेंबूर येथील घटना; दोन स्वतंत्र अपघाताची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – दोन वेगवेगळ्या अपघातात एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दहिसर आणि चेंबूर परिसरात घडली. मृतांमध्ये नकुल गणेश गुप्ता आणि रामभवन उदयराज यादव यांचा समावेश आहे. याप्रकरणी दहिसर आणि टिळकनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन हरेंद्र गणेश महंतो या आरोपी चालकास अटक केली तर दुसरा चालक अपघातानंतर पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सिमा गणेश गुप्ता ही महिला मिरारोडचच्या पाईन गौरव सिटीजवळील एव्हरशाईन अपार्टमेंटमध्ये राहते. ती कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, आशानगरजवळील गोकुळनगरीच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ती तिचा सहा वर्षांचा मुलगा नकुलसोबत तिच्या स्कूटीवरुन कामाच्या ठिकाणी जात होती. सकाळी सव्वादहा वाजता ही स्कूटी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर चेकनाका परिसरात आली असता एका सिमेंट मिक्सर चालकाने वाहन डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सिमासह तिच्या मागे बसलेला नकुल हे दोघेही खाली पडले. यावेळी मिक्सरच्या चाकाखाली आल्याने नकुल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या नकुलला श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच सायंकाळी साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पोलिसांनी हरेंद्र गणेश महंतो या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने मिक्सर चालवून एका सहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हरेंद्र हा वसईतील मालजीपाडा व्हिलेज परिसरात राहतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दुसर्‍या अपघातात रामभवन उदयराज यादव या ४७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला त्रिभुवन फागु यादव हा वडाळ्यातील ऍण्टॉप हिल परिसरात राहत असून मृत रामभवन हा त्याचा चुलत भाऊ आहे. तो लक्ष्मी फरसाण कंपनीत कामाला होता. मंगळवारी २७ फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता तो घाटकोपरच्या कामराजनगर येथे कामानिमित्त गेला होता. काम संपल्यानंतर तो मानखुर्द लिंक रोडने छेडानगर, जय अंबेनगर येथून जिजामाता बसस्टॉपच्या दिशेने जात होते. यावेळी त्याला एका कारने धडक दिली होती. त्यात त्याच्या पोटाला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारी २९ फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्रिभुवन यादव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका पादचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर आरोपी कारचालक पळून गेल्याने त्याचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांकडून शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page