मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मार्च २०२४
मुंबई, – साकिनाका आणि कुर्ला येथील दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकिनाका आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका चालकास अटक केली तर अपघातानंतर पळून गेलेल्या दुसर्या चालकाचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये संतोष गोविंद सावंग (४२) आणि फारुख शेख (५०) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात सोमवारी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास कुर्ला येथील कमानी जंक्शन, एलबीएस रोडच्या एचपी पेट्रोलपंपासमोरील घाटकोपर-सायन रोडवर झाला. फारुख शेख हे कुर्ला काजूपाडा, गांधीनगर झोपडपट्टीत राहत होते. सोमवारी ते एचपी पेट्रोलपंपसमोरुन जात असताना त्यांना भरवेगात जाणार्या एका ट्रकने धडक दिली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रााजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अपघाताची नोंद होताच पोलिसांनी आरोपी ट्रकचालक कृपाशंकर जंगलीलाल चौरासिया याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
दुसरा अपघात मंगळवारी १२ मार्चला सकाळी पाच वाजता साकिनाका येथील खैरानी रोड, शुक्रान हॉलसमोर झाला. मृत संतोष सावंग हा मूळचा बुलढाणा येथील खामगाव, रोहनाचा रहिवाशी आहे. तिथेच त्याची आई, पत्नी आणि दोन मुले राहतात. गेल्या तीन महिन्यांपासून तो अमन ट्रान्सपोर्ट कंपनीत डंपरवर माती उचलण्याचे काम करत होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या सहकार्यासोबत साकिनाका येथे कामासाठी गेला होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका टेम्पोने त्याच्या डंपरसह संतोषला धडक दिली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह नंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या अपघातानंतर साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आरोपी टेम्पोचालक अपघातानंतर घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकिनााका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.