मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका महिलेसह तीन वयोवृद्धांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गावदेवी, शिवडी आणि चेंबूर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन बेस्ट बसचालकासह एका कारचालकास अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर या तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली.
पहिला अपघात गावदेवी येथील एन. एस पाटकर रोड, एच पी पेट्रोलपंपाजवळ झाला. फारुख दादी बारिया हे ७८ वर्षांचे वयोवृद्ध ह्युजेस रोड, खारेघाट कॉलनीत राहत होते. बुधवारी १३ मार्चला सकाळी सव्वादहा वाजता ते एच. पी पेट्रोलंपपाजवळून जात होते. यावेळी एका बस बसने त्यांना धडक दिली. आ अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस शिपाई नरेंद्र विजय बागुल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी बेस्ट चालक सिद्धांत तान्हाजी चव्हाण याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविल होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या अपघातात मधु लालचंद भाटिया या ७३ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. सिद्देश अशोक भाटिया हे मुलुंडच्या नवघर परिसरात राहतात. मृत मधु ही त्याच्या आत्या असून ती अविवाहीत होती. ती सध्या चेंबूर येथील आर. के स्टुडिओजवळील मैत्री पार्क अपार्टमेंटमध्ये राहत होती. मंगळवारी १२ मार्चला सकाळी दहा वाजता ती चेंबूर येथील शीव-ट्रॉम्बे रोड, भारत पेट्रोल पंपासमोरुन रस्ता क्रॉस करत होती. यावेळी एका बेस्ट बसने धडक दिल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करणयात आले होते. तिथेच उपचार सुरु असातना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन बेस्ट बसचालक हरिश एकनाथ लाड याला अटक केली होती. अटकेनंतर या दोन्ही चालकांची जामिनावर सुटका करण्यात आली.
तिसरा अपघात मंगळवारी १२ मार्चला सायंकाळी चार वाजता शिवडी येथील मिरादातार दर्गाजवळील प्रेस इमारतीसमोर झाला. रावी अब्बासअली जफार हे व्यवसायाने वकिल असून भायखळा येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मृत अब्दुल हे त्यांचे सख्खे मामा असून ते भायखळा येथे एकटेच राहतात. त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी रावी जफार यांच्यावर होती. अब्दुल हे दुपारी त्यांच्या मित्राकडे नियमित जात होते. मंगळवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे त्यांच्या मित्राकडे स्कूटरवरुन जात होते. ही स्कूटर प्रेस इमारतीसमोरुन जात असताना एका कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली होती. या अपघातात अब्दुल हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रावी जफार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक राजू ज्योती रामलिंगमविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच राजूला पोलिसांनी अटक केली.