सहा वर्षांच्या पुतण्याच्या मृत्यूनंतर नैराश्यातून काकाची आत्महत्या
अपघाती मृत्यूसह आत्महत्येने मानखुर्द परिसरात शोककळा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनकडून मेट्रो पिलरच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून आयुष राजेश शेगोकार या सहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताने मानसिक नैराश्यातून त्याच्या काकांनी सायंकाळी चेंबूर-गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शैलेश शेगोकार असे आत्महत्या केलेल्या काकांचे नाव आहे. एकाच दिवसांत पुतण्यासह काकांच्या मृत्यूने मानखुर्द परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. दरम्यान आयुषच्या मृत्यूप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन अभियंता कार्तिक सांमत आणि सुपरवायझर दिपेश म्हात्रे या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयुष हा त्याचे काका शैलेश शेगोकार यांच्यासोबत मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले नगरात राहत होता. रविवारी सकाळी तो घराजवळ खेळत होता. यावेळी पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात आयुष पडला. त्याला स्थानिक रहिवाशांनी बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना तिथे मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने मेट्रोच्या पिलरसाठी खड्डा खोदला होता. त्यात पाणी साचले होते, त्याच पाण्यात बुडून आयुषचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कार्तिक सांमत आणि दिपेश म्हात्रे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरीकडे आयुषच्या मृत्यूची माहिती नंतर शैलेश यांना देण्यात आली होती. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. सायंकाळी शैलेश हे गोवंडी-चेंबूर रेल्वे स्थानकदरम्यान गेले आणि त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा ही माहिती शेगोकार कुटुंबियांना समजताच त्यांना प्रचंड धक्का बसला होता. एकाच दिवशी पुतण्यासह काकांच्या मृत्यूने मानखुर्द परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. अपघात आणि आत्महत्या एकाच घटनेशी संबंधित असल्याने त्याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.