अपहरणासह लैगिंक अत्याराच्या गुन्ह्यांतील आरोपीचे पलायन

वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये आणले होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2025
मुंबई, – अल्पवीन मुलीच्या अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 24 वर्षांच्या आरोपीने शुक्रवारी दुपारी जे. जे हॉस्पिटलमधून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतर जेवण देण्यात आले होते, यावेळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जे. जे मार्ग पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार घाटकोपर परिसरात राहत असून त्यांची सतरा वर्षांची बळीत मुलगी आहे. तिचे संघर्ष नावाच्या एका 24 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 27 जानेवारी 2025 रोजी ती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. चौकशीनंतर ती भुसावळ येथे गेल्याचे उघडकीस आले. संघर्ष हा जळगावच्या भुसावळ, कंधारीचा रहिवाशी आहे. त्यानेच त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस येताच त्यांनी मुलीच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीसह मिसिंग झालेल्या मुलीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मेडीकलनंतर या मुलीवर संघर्षने लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेडीकलनंतर त्याला दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अपघात विभाग येथे असताना जेवण देण्यात आले होते. यावेळी तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो पळून गेल्याची खात्री पटताच पोलीस हवालदार रामराव गोपाळराव जाधव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संघर्षविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page